लोणी : महापशुधन एक्स्पो राज्यास दिशादर्शक ठरेल : खा. डॉ. सुजय विखे पा | पुढारी

लोणी : महापशुधन एक्स्पो राज्यास दिशादर्शक ठरेल : खा. डॉ. सुजय विखे पा

लोणी; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो 2023’ चे आयोजन (दि.24 ते 26 मार्च 2023) दरम्यान करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन प्रत्येक कार्यकर्त्याने यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी केले.

शिर्डी येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर लोणी येथे राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी येथील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. यावेळी खा. डॉ. विखे यांनी प्रदर्शनासंदर्भात तयारीचा आढावा घेत तीन दिवस होणार्‍या कार्यक्रमांची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. यावेळी विविध संस्थांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शना संदर्भात खा. डॉ. विखे म्हणाले म्हणाले, देशात 13 राज्यांमधील पशु-पक्ष्यांच्या 1500 प्रजाती प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून, देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशु पालनाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग निश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञानाबाबत पशु पालकांना प्रात्यक्षिकांसह प्रदर्शनात तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यातून येणार्‍या पशु पालकांना उपयुक्त ठरेलच, परंतु नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असल्याचे खा. डॉ. विखे म्हणाले.

शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यास आवश्यक यंत्रे, उपकरणे व पशु संवर्धनाशी निगडीत बाबींसाठी उत्पादनांचे स्टॉल सुमारे 46 एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून, यजमान पद शिर्डीकडे आहे. प्रत्येक गावांतून महिला बचत गटांसह इतर महिला, शालेय विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 100 बसेसची सुविधा पुरविण्यात येणार आहे. शिर्डी मतदारसंघासह राहाता, संगमनेर, राहुरी व श्रीरामपूर भागातील कार्यकर्त्यांनी यासाठी गाव पातळीवर नियोजन करावे.

सकाळच्या सत्रात विद्यार्थी तर दुपारच्या सत्रात महिला असे नियोजन करतानाच युवकांनी स्वयंसेवक म्हणून योगदान द्यावे. जिल्ह्यातील प्रत्येक कुंटुंबातील एकाने तरी ‘महापशुधन एक्स्पो व यानिमित्त होणारा सांस्कृतिक महोत्सव, महिला बचत गटांचे दालन बघावे, असे आवाहन खा. डॉ. विखे यांनी केले आहे.

आता महिला, विद्यार्थी व युवकांसाठी काम करु!
आपले सर्वजण या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या कार्यक्रमाचा विक्रम आपल्या सर्वाना करायचा आहे. नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या सहकार्याने महसूलचे सर्व प्रश्न निकाली निघत आहेत. एप्रिलमध्ये जिल्ह्यात जमीन मोजणी अभियानासह 1 हजार रुपयामध्ये 1 ब्रास वाळू उपलब्ध करुन दिली जाईल. मतदार संघात नवीन 50 रोहित्रांची कामे पूर्ण झाली. आणखी 100 रोहित्र बसविले जातील. लवकरच प्रत्येक गावात मंत्री विखे पा. दौरा करुन, गावांचे प्रश्र सोडविणार आहेत, असे सांगत वयोश्री योजनेतून वयोवृध्द नागरीकांना आधार दिल्याने अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परीवर्तन झाले. आता महिला, विद्यार्थी व युवकांसाठी काम उभे करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस येणार!
महापशुधन एक्स्पोचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. प्रत्येकाने यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी केले आहे.

Back to top button