

नगर : दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. नगर-मनमाड रस्त्यावरील सनफार्मा चौकाजवळून आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. रवी रामदास नेटके (रा.गोटुंबे आखाडा, ता.राहुरी) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक शुक्रवारी (दि.17) पेट्रोलिंग करीत असताना नगर-मनमाड रस्त्यावर एक संशयित मोपेडवरून येत असताना दिसला.
त्याच्याजवळील दुचाकीची माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीजवळ असलेली दुचाकी चोरीची असून, भोसरी (पुणे) येथून चोरी केल्याची बाब तपासात उघड झाली. पोलिसांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सातारा जिल्ह्यातील एक दुचाकी व इतर आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नंदकुमार सांगळे, सरेश सानप, नवनाथ दहीफळे, सुरज देशमुख यांनी ही कारवाई केली.