कर्जत : सूडभावनेतून बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई : उपाध्यक्ष सुभाष गुळवे | पुढारी

कर्जत : सूडभावनेतून बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई : उपाध्यक्ष सुभाष गुळवे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. केवळ राजकीय सूड भावनेतून कारखान्यावर कारवाई करण्यात येत आहे. शेतकर्‍यांसाठी चांगले काम करणारा कारखाना यापुढील काळात देखील असेच चांगले काम करत राहणार असल्याचे बारामती अ‍ॅग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्यावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाळप परवानगी अगोदर पाच दिवस कारखाना सुरू करण्यात आला. कारखान्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती.

गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना सर्व नियमांचे पालन करत चालविला जात आहे. तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याची पाहणी करून क्लिन चीट दिलेली आहे. मात्र, केवळ राजकीय सत्तेचा दुरुपयोग करत कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचा कोणताही परिणाम कारखान्यावर होणार नाही.

बारामती अ‍ॅग्रो, हळगावचा जय श्रीराम आणि अंबालिका शुगर हे कारखाने शेतकर्‍यांना चांगला भाव देत आहेत. या कारखान्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांचा फायदा झाला आहे. आमचा ऊस तोडा यासाठी शेतकर्‍यांना आता कोणाच्याही दारामध्ये जावे लागत नाही. हे सहन न झाल्याने केवळ राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून आ. शिंदे यांनी ही कारवाई करण्यासाठी भाग पाडल्याचे सुभाष गुळवे यांनी सांगितले.

विकासकामांत खोडा घालण्याचे काम
ज्यांना कधी साधे उसाचे गुर्‍हाळ सुरू करता आले नाही, त्यांनी शेतकर्‍यांच्या विरोधात जात केवळ त्रास देण्याचे हेतूने अशा तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी शेतकर्‍यांच्या हिताच्या नाहीत. केवळ चांगल्या आणि विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम आ. शिंदे करत आहेत, अशी टीका गुळवे यांनी केली.

आमदार शिंदेंचे शेतकर्‍यांना सहकार्य नाही
करमाळा तालुक्यातील कारखान्याकडे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांची उसाचे पैसे थकले त्यावेळी आ. शिंदे यांच्याकडे बारा खात्याच्या मंत्रीपदाचा कारभार होता. त्यावेळी त्यांनी थकीत पैसे मिळविण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांना कोणतेही सहकार्य केले नाही. आ. पवार यांनी समन्वयातून शेतकर्‍यांना पैसे मिळवून दिले. शेतकर्‍यांची आडलेली आणि होत असलेली विकासकामे सहन होत नसल्याने सूड भावनेतून आणि केवळ शेतकर्‍यांना विरोध करण्यासाठी खोट्या तक्रारी करून सत्तेचा गैरवापर करत हे गुन्हे दाखल केल्याचे गुळवे यांनी सांगितले.

Back to top button