काष्टीतील दूध भेसळीवर छापा

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : राहुरी पाठोपाठ श्रीगोंद्यातही दूध भेसळीचा अन्न औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. काष्टी येथे शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. बाळासाहेब बाबुराव पाचपुते (वांगदरी रोड, काष्टी) आणि संदीप मखरे (रा.मखरेवाडी, श्रीगोंदा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनांचा वापर करून तयार केलेले 460 लिटर दूध पोलिसांच्या मदतीने नष्ट करण्यात आले. व्हे पावडर, लाईट लिक्विड पॅराफीनचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच दोघेही आरोपी पसार झाले आहेत.
पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच भेसळीचे दूध बनविण्याचा गोरख धंदा उघडकीस आला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाळासाहेब पाचपुते यांच्या घरात 21 किलो व्हे पावडर आणि 35 लिटर लाईट लिक्विड पॅराफीनचा साठा मिळून आला. घराबाहेर असलेल्या पिकअपमधील 460 लिटर भेसळीचे दूध जप्त करत नष्ट केले. भेसळसाठी वापरलेली पावडर मखरेवाडी येथील संदीप मखरे यांच्याकडून खरेदी केल्याचे पाचपुते यांनी सांगितले.