पाथर्डी तालुक्याला गारपिटीचा तडाखा; पिकांसह शेतीमालाचे नुकसान | पुढारी

पाथर्डी तालुक्याला गारपिटीचा तडाखा; पिकांसह शेतीमालाचे नुकसान

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळगाव टप्पा, चिंचपूर ईजदे, कुत्तरवाडी, करोडी येथे शनिवारी गारपीट होऊन शेती पिकासह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी विजांच्या गडगडासह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. खरिपानंतर रब्बी हंगामातही अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट अशा तडाख्यातून शेतकर्‍यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यात शेतीमालाला भाव नाही. कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यातच गारपिटीने या भागात शेतात उभे असलेले कांदा, गहू व फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. चारीही बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे.

गारपिटीमुळे टरबूज, लिंबू, आंबा, डाळिंब तसेच पालेभाज्य यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होणार आहे. काही शेतामध्ये आंब्याच्या झाडाला आलेल्या कैर्‍यांचा जमिनीवर खच पडला होता. काही ठिकाण शेतजमिनीत पाणी साचले होते. गारपिटीची तीव्रता कमी असली तरी, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी चिंचपूर ईजदेच्या सरपंच पुष्पा मिसाळ यांनी केली आहे.

नगर शहरातही जोरदार पाऊस
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसानंतर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा नगर शहरासह सावेडी, केडगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पावसाबरोबरच गाराही पडल्या.

चिंचपूर इजदे व कुत्तरवाडी भागात शनिवारी गारपीट झाली असून, त्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात येतील.

                                              – शाम वाडकर, तहसीलदार, पाथर्डी

Back to top button