कोळपेवाडी : आ. काळेंनी कोपरगावच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष | पुढारी

कोळपेवाडी : आ. काळेंनी कोपरगावच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या जिव्हाळ्याच्या पाटपाणी प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहर, ग्रामीण पोलिस स्टेशनची रिक्त पदे तातडीने भरावी, शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावे, वीज रोहित्रांची संख्या वाढवावी, शहा येथील 132 के.व्ही. चे सब स्टेशनला मतदार संघातील वीज उपकेंद्र तातडीने जोडावे, असे विविध प्रश्न मांडून आ.आशुतोष काळे यांनी 2023-24 अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले.

आ. काळे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार 2022 रोजी कोपरगाव येथे विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कोपरगाव मतदार संघात आले होते. त्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन व पोलिस कर्मचारी वसाहतीसाठी निधी देण्याची जाहीर घोषणा केली होती.

त्या निधीतून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या कामांना तातडीने प्रारंभ करून लवकर काम पूर्ण करून, पोलिस कर्मचार्‍यांना निवासस्थाने मिळावीत. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. दोन्ही पोलिस स्टेशनसाठी स. फौजदार, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, पो. नाईक, लेडीज कॉन्स्टेबल पदे मंजूर असुनसुद्धा जागा रिक्त आहेत.

कोपरगाव मतदार संघातील सुमारे 650 वीज रोहित्रांवर ओव्हर लोड आहे. त्यामुळे सातत्याने वीज रोहित्र नादुरुस्त होऊन शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात अतिरिक्त वीज रोहित्र संख्या वाढवून मिळावी. तसेच वारी वीज उपकेंद्रासाठी मंजूर असलेल्या 5 एम. व्ही.ए. च्या ट्रान्सफॉर्मरचे काम तातडीने पूर्ण करावे. रवंदे वीज उपकेंद्रासाठी 5 एम. व्ही.ए. चा ट्रान्सफॉर्मर मिळावा, यासाठी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, असे आ. काळे म्हणाले.

सिन्नर तालुक्यातील शहा येथील 132 के.व्ही.चे सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे. त्या सबस्टेशनला कोपरगाव तालुक्यातील वीज उपकेंद्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे कोपरगावच्या वीज उपकेंद्रावरील भार कमी होऊन पूर्ण क्षमतेने सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. यासाठी तातडीने शहा येथील 132 के. व्ही. सबस्टेशनला कोपरगाव तालुक्यातील वीज उपकेंद्र जोडण्याचे काम सुरू करावे. कोपरगावातील वीज वाहिन्या भूमिगत कराव्या आदी प्रश्नांकडे आ. काळे यांनी 2023-24 अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले.

पोलिसांची नेमणूक करा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
कोपरगाव तालुक्याची मोठी लोकसंख्या व पोलिस कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो. परिणामी वेळप्रसंगी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यासाठी कोपरगाव शहरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली.

Back to top button