नगर : शेतकर्‍यांवर आभाळच ‘फाटलं’! आस्मानी संकटाने सर्वच पिकांचे नुकसान | पुढारी

नगर : शेतकर्‍यांवर आभाळच ‘फाटलं’! आस्मानी संकटाने सर्वच पिकांचे नुकसान

शशिकांत पवार

नगर तालुका : तालुक्यात झालेला वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची अवस्था अक्षरश: आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात ढगाळ वातावरण, वादळी वारा, काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा फटका शेतकर्‍यांना चांगलाच बसला आहे. कांदा, भाजीपाल्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच हतबल झालेला असताना, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर घातली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे पूर्णतः देशोधडीला लागणार आहे.

तालुक्यात खरिपाची पिके मूग, सोयाबीन, बाजरी अतिवृष्टीने वाया गेली. कांद्याच्या रोपांची वाताहत झाली. पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने खरिपात झालेले नुकसान रब्बी पिकांमध्ये वसूल होईल, या आशेवर कर्ज काढून, उसनवारी करत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करत गहू, हरभरा, ज्वारी, गावरान कांदा, चारा पिकांची पेरणी केली. परंतु, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण, वादळ वार्‍याने रब्बी पिकांचीही वाताहत झाली आहे.

काढणीला आलेला गहू, चारा पिके मका, कडवळ भुईसपाट झाले. गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे. कांदा, लसूण पिकांवर डाऊनी, करपा, मवा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांदा, लसणाच्या उत्पादनात देखील घट होणार आहे. त्यात काढणीला आलेल्या कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने सडणार आहे.

तसेच, सदर कांदा साठवणीसाठी चाळीत जास्त दिवस टिकणार नाही. मेथी, कोथिंबीर व इतर पालेभाज्यांना भावच नसल्याने शेतकर्‍यांनी पालेभाज्यांमध्ये नांगर घातला, ही वास्तवता आहे. तर, हरभरा पिकांवर घाटी आळीचा प्रादुर्भाव झाला असून, हरभरा पिवळा पडणार आहे. कोबीवर अळीचा प्रादुर्भाव तर फ्लॉवर पिवळा पडल्याने बाजारात भाव मिळणार नाही. ज्वारी पिकांवर चिकटा तसेच मवा रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

वातावरणातील बदलाचा फटका डाळिंब, तसेच आंबा या फळबागांनाही बसला आहे. डाळिंबाची फुलकळी (मोहोर) तसेच आंब्याचा मोहोर देखील वादळामुळे गळल्याने फळांच्या उत्पादनात घट होणार आहे. एकंदरीत वातावरणात झालेल्या बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाला असून, शेतकर्‍यांसमोर आस्मानी संकट उभे राहिले आहे.

अतिवृष्टीने नुकसान झाल्याने खरीप पिकांचे उत्पादन पदरी पडलेच नाही. सध्या गावरान कांदा, चारा पिकांवर पाऊस व ढगाळ वातावरणाने रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. झालेला खर्च देखील वसूल होणार नाही.

                                        – सोपान आव्हाड, शेतकरी, पांगरमल

लाल कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. संपूर्ण वर्षात शेती तोट्यात गेली आहे. शेतातील कांदा, हरभरा, गहू, चारा पिकांचे वातावरणातील बदलाने नुकसान झाले आहे.

                                              – उल्हास जरे, शेतकरी, इमामपूर

खरीप वाया गेला. लाल कांदा, भाजीपाल्याला भाव नाही. रब्बीला अवकाळी पावसाने दगा दिला. संपूर्ण शेती तोट्यात गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

                                       – बाबासाहेब तवले, शेतकरी, चिचोंडी पाटील

Back to top button