कर्जत : फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती सुरू; आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न | पुढारी

कर्जत : फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती सुरू; आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : सीना कालव्याचे आवर्तन सुरू असताना मिरजगाव जवळ कालवा फुटला. याबाबत अधिकार्‍यांनी तत्काळ दुरुस्ती करून आवर्तन सुरू करण्याची आवश्यकता असताना दुर्लक्ष केले. आवर्तन बंद झाल्यानेे शेतकरी संकटात सापडला. आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत या कालव्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे पुन्हा आवर्तन सुरू होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. तब्बल 42 वर्षांपूर्वी बांधलेला सीना कालवा एकदाही दुरुस्त करण्यात आलेला नाही.

परंतु, गेल्या दोन वर्षांत आमदार पवार यांनी हे काम हाती घेतले. आतापर्यंत 10 किलोमीटर कालव्याची साफसफाई, गाळ काढणे ही कामे केली असून, 65 नवीन गेटही बसविण्यात आले आहेत. तसेच, नव्याने 5 कोटी रुपयेही त्यासाठी मंजूर करून आणले आहेत. यामध्ये अस्तरीकरण, कालव्याची दुरुस्ती, साफसफाई, सायपन दुरुस्ती, पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हेही काम तातडीने हाती घेण्यात येणार होते. परंतु, त्यामुळे उन्हाळी आवर्तन सोडण्यास उशीर झाला असता. त्यामुळे दोन्ही उन्हाळी आवर्तन संपल्यानंतर ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मिरजगाव येथे हा कालवा फुटल्याने उन्हाळी आवर्तन बंद करावे लागले. या फुटलेल्या कालव्याचे कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम करण्यास किमान दीड महिना वेळ लागला असता. परिणामी पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे शेतकर्‍यांशी चर्चा करुन हे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कालव्याच्या दोन्ही बाजूने माती आणि मुरुमाचा भराव आणि मध्ये लोखंडी पाईप टाकून पाणी पुढे नेण्याचे काम आमदार पवार यांच्या सूचनेनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या यांत्रिकी विभागाकडून हाती घेण्यात आले.

सध्या भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, लोखंडी पाईप तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी आमदार पवार यांचा कृष्णा खोरे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू आहे. पाईप उपलब्ध होताच पुढील चार दिवसांत हे काम पूर्ण करुन आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. दोन्ही आवर्तन झाल्यानंतरच या कालव्याच्या कायमस्वरुपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. आमदार पवार यांनी अधिवेशनातही हा प्रश्न मांडून पाईप उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

अधिकार्‍यांवर कारवाई होणार का
आवर्तन सोडताना कालव्याची परिस्थिती पाहून नियोजन करणे गरजेचे होते. केवळ अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे कालवा फुटला व शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. यामुळे अधिकार्‍यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन-तीन दिवसांत पाईप उपलब्ध होतील. लवकरच हे काम पूर्ण होईल. आवर्तन संपल्यानंतर कायमस्वरुपी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल.

                      – आमदार रोहित पवार

 

Back to top button