

सोनई; पुढारी वृत्तसेवा : चोरी होत नसल्याचा लौकिक असलेल्या शनिशगिणापूरमध्ये शुक्रवारी चक्क चोरी झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली. विशेष म्हणजे पोलिसांनीही तातडीने तपास करत चोराला पकडले आणि त्याने चोरलेला मुद्देमालही जप्त केला.
याबाबत माहिती अशी ः उत्तर प्रदेशातील भाविक तरुण खेमचंद मोटवाणी (वय 34, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. त्यांच्या गाडीतून पैसे चोरीस गेले होते. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तपासात त्याच गाडीच्या चालकाने पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले. शनिशिंगणापूर पोलिसांनी चालकास अटक केली आहे.
याबाबत मोटवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी सकाळी शिर्डी येथून एमएच 17 सीए 9990 ही इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने घेऊन शनिदर्शनासाठी आलो होतो. शनिशगिणापुरात शनिदर्शनासाठी जाताना बॅग व इतर सामान गाडीतच ठेवले होते. दर्शन करून परतल्यानंतर बॅगेतील 30 हजार रुपये नसल्याचे लक्षात आले. ड्रायव्हरला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.
सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी ड्रायव्हर भाऊसाहेब पोपट कोळपे याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व गाडीत लपवलेले पैसेही काढून दिले. गुन्ह्याच्या तपासकामी त्याच्याकडील वाहन व 30 हजार रुपये असा 15 लाख 30 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार सप्तर्षी करत आहेत.