नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी | पुढारी

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

नगर; पुढारी वृत्तसेवा : आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात महेश प्रभाकर चाचर (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील जिल्हा न्यायाधीश एम. बरालिया यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पीडित मुलगी एका आश्रमशाळेत सातवीत शिकत होती. ती आश्रमशाळेतील होस्टेलमध्ये राहत होती. आरोपी व त्याची पत्नी त्याच होस्टेलमध्ये वॉर्डन होते. आरोपीने मुलीच्या खोलीत जाऊन लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने प्रतिकार केला होता. नंतर सात ते आठ दिवसांनी आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. नंतरही आरोपीने अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. संस्थाचालकाला ते कळल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना माहिती दिली. नंतर राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी महेश प्रभाकर चाचर व संस्थाचालक दत्तात्रय बाळासाहेब वाणी आणि प्राचार्य लीलावती विवेकानंद जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात 14 साक्षीदार तपासण्यात आल्या. न्यायालयाने आरोपी महेश चाचरला शिक्षा ठोठावली व पुराव्याअभावी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के. एन. पारखे यांनी सहकार्य केले.

Back to top button