राहुरीतून दीड लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त | पुढारी

राहुरीतून दीड लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरात अवैध गुटखा विक्री चालू असल्याची गुप्त खबर थेट पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांना मिळाली. त्यांच्या आदेशाने राहुरी पोलिस पथकाने काल पहाटेच्या दरम्यान शहरातील राजेंद्र ऊर्फ भैय्या भूजाडी याच्या घरात छापा टाकून सुमारे दिड लाखांचा गुटखा जप्त करून आरोपीला गजाआड केले.

परवा (दि. 15) मार्च रोजी राहुरी पोलिस ठाण्याची वार्षिक दफ्तर तपासणीसाठी नाशिक परिक्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील हे सायंकाळी राहुरी पोलिस ठाण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत दफ्तर तपासणी चालू असताना त्यांना गुप्त खबर्‍याने गुटखा विक्री चालू असल्याची खबर दिली.

पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलिस नाईक गणेश लिपणे, दिपक फुंदे, दिगंबर सोनटक्के, होमगार्ड सागर देशमुख, महेश धोंडे तसेच चालक लक्ष्मण बोडखे आदि पोलिस पथकाने काल (दि. 16) पहाटे दिड वाजेच्या सुमारास राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरातील डावखर खळवाडी येथील आरोपी राजेंद्र भुजाडी याच्या घरात छापा टाकला. त्यावेळी पोलिस पथकाने भुजाडी याच्या घरात 1 लाख 54 हजार 400 रुपयांचा गुटखा मिळून आला. यामध्ये हिरा, विमल व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल असून आरोपीस गजाआड केले आहे.

या घटनेमुळे तालूक्यातील इतर गुटखा विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून त्यांनी आपल्या कडील माल ताबडतोब लंपास केल्याची शहरात चर्चा चालू आहे. तालूक्यात अनेकजण राजरोसपणे गुटखा विक्री करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहेत.

Back to top button