नगर : कामावर हजर व्हा; अन्यथा कारवाई! सीईओंची कर्मचार्‍यांना नोटीस | पुढारी

नगर : कामावर हजर व्हा; अन्यथा कारवाई! सीईओंची कर्मचार्‍यांना नोटीस

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी सुरू केलेला संप काल तिसर्‍या दिवशीही सुरूच होता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सुचनांनुसार दहा हजार शिक्षकांना, एक हजार ग्रामसेवकांना तसेच मुख्यालयातील 200 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना ईमेल, व्हॉटस्÷ अ‍ॅपद्वारे नोटिसा दिल्या आहेत. संप बेकायदेशीर असून, तत्काळ कामावर हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सीईओंनी नोटिशीत दिला आहे.

राज्य कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारला आहे. काल तिसर्‍या दिवशी जिल्हा परिषद आवारात कर्मचार्‍यांची मोठी एकजूट पहायला मिळाली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आता माघार नाही, अशीच भूमिका संघटनेचे सुभाष कराळे, विकास साळुंके, अभय गट, संदीप वाघमारे, आल्हाट, संजय बनसोडे आदींनी केली.

दरम्यान, बहुसंख्य कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. याची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी विभागप्रमुखांना नोटीसा बजाविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, हे काम करण्यासाठी कक्ष अधिकारी नसल्याने विभागप्रमुखांनाच धावपळ करावी लागली. यात कर्मचारी संघटनांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सामूहिक नोटीस पाठविण्यात आल्याचे समजले.
काम नाही, तर वेतन नाही!

या नोटिसांत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीनुसार भंग केल्याने आपणाविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये. शासनाचे ‘काम नाही, तर वेतन नाही’ नुसार आपण संपात सहभागी असल्यामुळे आपले वेतन कपात का करू नये, याबाबत आपला खुलासा विनाविलंब त्वरित सादर करावा, तसेच आपला संप हा बेकायदेशीर असून, नोटीस मिळताच कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या सीईओंच्या स्वाक्षरीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदीसह सर्व विभागप्रमुखांच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत.

झेडपीच्या 557 शाळा सुरू!
जिल्हा परिषदेच्या 3500 शाळा, तर सुमारे 12 हजार शिक्षक आहेत. या संपात सहभागी शिक्षकांना ईमेलवर नोटीसा दिल्या आहेत. तर साधारणतः 1100 ते 1200 शिक्षक संपात नसल्याने 557 शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

तीनशे कर्मचारी कामावर हजर?
संपातील काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात असलेली 1100 ही उपस्थिती काल गुरुवारी 1400 पर्यंत निदर्शनास आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे. तर, दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी आमच्या एकाही कर्मचार्‍याने संपातून माघार घेतलेली नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उपस्थितीच्या आकडेवारी विषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

नोटीस तयार करायलाही कर्मचारी नाही
सीईओ येरेकर यांनी नोटिसा बजाविण्याबाबत सूचना केल्या. मात्र, विभाग प्रमुखांकडे कक्ष अधिकारी नाहीत, दुसरे कर्मचारीही नाहीत, त्यामुळे या नोटिसा कशा तयार करायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी ऑपरेटरला घेऊन विभागप्रमुख स्वतःच बसले आणि त्यांनी नोटिसा तयार केल्याचे सूत्रांकडून समजले.

संपातील आकडेवारी
विभाग संपकरी संपात नाही
गट अ – 180
गट ब – 158
गट क 13565 1079
गट ड 629 62

  • 10 हजार गुरुजींना ईमेलवर बजावल्या नोटिसा
  • 1050 ग्रामसेवकांना बीडीओंकडून नोटीस
  • नोटीस बजाविण्यासाठी ईमेल, व्हॉटस् अ‍ॅपचा वापर

Back to top button