पारनेर : मुरमाची बेकायदा बेसुमार वाहतूक; महसूलचे दुर्लक्ष, प्रवाशांना मनस्ताप

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती फाटा, बाबुर्डी ते औद्योगिक वसाहतीदरम्यान बेकायदा मुरूम वाहतूक रात्रंदिवस केली जात आहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुरूम तस्करांनी मंगळवारी (दि.14) तर हद्दच केली. हायवातून भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती फाटा दरम्यान रस्त्यावर दगडांचा ढीगच लावला.
याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. खड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडला. रात्रंदिवस बेसुमार हायवाच्या साह्याने मुरूम वाहतूक केली जात असून, पारनेरचे तहसीलदार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मुरूम वाहतुकी विरोधात आंदोलन केले होते. रस्त्यावर मुरूम वाहतूक करणार्या गाड्या अडवून केलेल्या आंदोलनाची शासकीय पातळीवर दखल घेण्यात आली व सर्व गाड्या बंद करण्यात आल्या.
काही दिवसांनंतर पुन्हा भरधाव धावणार्या मुरमाच्या वाहनांंमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री-अपरात्री बेफाम चालणार्या वाहतुकीमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याचा महसूलने गांभीर्याने विचार करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भोयरे गांगर्डा व बाबुर्डी ग्रामस्थांनी केली.
तहसीलदारांच्या कारवाईकडे लक्ष
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार तालुक्यात गौण खनिजाची वाहतूक करणार्यांना लाखो रूपयांचा दंड करण्यात आला. मुरुम वाहतुकीमुळे भोयरे गांगर्डा रस्त्याची वाट लागली आहे. लाखो रूपयांचा महसूल बुडविला जात असताना तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.