मढी परिसरात पशुहत्या नको; देवस्थान समिती

मढी; पुढारी वृत्तसेवा : मढी यात्रेदरम्यान कानिफनाथांना भाविकांनी गोड नैवेद्य करावा. मंदिर परिसर व मढी हद्दीत पशुहत्या करू नये, असे आवाहन मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड यांनी केले आहे. नाथांना मलिदा, रेवडी असा गोड पदार्थांचा नैवद्य असल्याची मढी येथील हजारो वर्षाची परंपरा आहे. श्री क्षेत्र मढी यात्रेला 6 मार्चला प्रांरभ झाला असून, गुढीपाडव्याच्या महापूजेने यात्रेची सांगता होईल. मढी येथील तिसरा टप्पा दरम्यान जातपंचायती व न्यायनिवडे चालत असत.
मात्र, न्यायालयाने बंदी घातल्यानंतर येथील जातपंचायती व न्याय निवाडे बंद झाले आहेत. त्यामुळे पंधरा दिवस चालणारी मढी यात्रा आता पाच दिवसांवर आली आहे. यात्रेचा तिसरा टप्पा फुलबाग यात्रेचा असून, रंगपंचमी झाल्यानंतर पशूहत्या मोठ्या प्रमाणात होतात. पशुहत्या करून तो नैवेध नाथ संप्रदायाला मान्य नाही. नाथांना, रेवडी, मलिदा असा गोड पदार्थांचा नैवद्य भाविक करतात. त्यामुळे कानिफनाथ मंदिर व मढी परिसरात भाविकांनी पशुहत्या करू नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.