कर्जत : कालवा दुरुस्ती थांबविल्याने रास्ता रोको; सीना कालवा फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान | पुढारी

कर्जत : कालवा दुरुस्ती थांबविल्याने रास्ता रोको; सीना कालवा फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान

कर्जत: पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गावर सीना कालवा फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून, या कालव्याच्या दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने निधी मंजूर केला होता. मात्र दुरुस्तीचे सुरू झालेले काम नव्या सरकारच्या काळात थांबवल्याच्या निषेधार्थ काल (गुरुवारी) माहीजळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे व तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

यावेळी रामदास चौगुले, रामभाऊ शेटे, मनोज खेडकर, गोकुळ इरकर, सचिन शेटे, माजी सभापती देवराव तांबे, अरुण शेटे, उपसरपंच नवनाथ शिंदे, नाना तोरडमल, सुधीर फरताडे, नामदेव लाड, नवनाथ डुकरे, विष्णू खेडकर, पिनू सकट आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेवाळे म्हणाले की, सीना कालवा दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

परंतु काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरला करू देत नाहीत. ते काम तत्काळ करून द्यावे. मिरजगावजवळ खेतमाळीस वस्ती येथे सीना कालवा फुटला आहे. यामुळे आवर्तन बंद पडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. हा कालवा फुटण्यास संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. कालवा फुटल्यानंतर अधिकार्‍यांनी तत्काळ दुरुस्ती करून आवर्तन पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता असतानाही त्यांनी हलगर्जीपणा केला. यामुळे याचा फटका शेतकर्‍यांना बसला, असा आरोप शेवाळे यांनी केला.

शेतकर्‍यांची वीज तोडण्यात येत आहेत, वीजपुरवठा सुरळीत सुरू नाही. यामुळेही शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत शेवाळे यांनी निषेध केला. किरण पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्यात यावे. कर्जत-जामखेड मतदारसंघ स्व. लोकनेते आबासाहेब निंबाळकरांच्या विचारांचा आहे. परंतु सध्या मतदारसंघात श्रेयवादासाठी फक्त सोशल आणि ट्विटर वॉर चालू आहे. ही बाब खूप घातक आहे.

आढळगाव-जामखेड रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, माहीजळगाव आणि परिसरातील इतर खेडोपाड्यांसाठी जास्त क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, तसेच शेतकर्‍यांना ठरलेल्या वेळेत पाण्याचे आवर्तन मिळावे. अन्यथा यापुढे मोठे जण आंदोलन उभारले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. दरम्यान, फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण करू,असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.

Back to top button