

नगर; पुढारी वृत्तसेवा : विकासभारामधील 75 टक्के रक्कम भूसंपादनासाठी राखीव ठेवली जाते. भूसंपादनासाठीचे 15 कोटी शिल्लक असल्याचे नगरचनकार राम चारठाणकर सांगतात. लेखा अधिकारी शैलेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार खात्यावर फक्त 6 कोटी 79 लाख आहेत. मग, उर्वरित पैसे गेले कोठे? असा सवाल विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह सदस्यांनी केला. त्यावर नगररचनाकार चारठाणकर यांनी गोलमाल उत्तर दिले आणि वेळ मारून नेली. मात्र, त्याचा तपशील द्यावा, अशा सूचना सभापती गणेश कवडे यांनी चारठाणकर यांना दिल्या.
महापालिकेच्या 1240 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पावर सुरू असलेली स्थायी समितीतील चर्चा बुधवारी तहकूब करण्यात आली होती. गुरूवारी दुपारी पुन्हा चर्चा सुरू झाली. सभापती कवडे अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक संपत बारस्कर, विनीत पाऊलबुधे, प्रदीप परदेशी, नगरसेविका पल्लवी जाधव, रूपाली वारे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, मुख्य लेखा अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते.
मुख्य लेखा अधिकारी मोरे यांनी अर्थसंकल्पाच्या तरतुदींचा तपशील सभेसमोर मांडला. विकासभाराच्या तरतुदीवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले, विकासभार निधीतील भूसंपादनासाठी 75 टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यातील 15 कोटी शिल्लक असल्याचे नगररचनाकार चारठणकर यांनी सभेत सांगितले होते.
त्यावर मुख्यलेखा अधिकारी मोरे म्हणाले, वाणिज्य विभागाकडे खात्यावर 6 कोटी 86 लाख रूपये आहेत. मग, उर्वरित पैसे गेले कोठे याचा तपाशील द्यावा. त्यावेळी चारठाणकर हतबल झाल्याचे दिसले. ते म्हणाले, विकासभार निधीमध्ये एकत्रित निधी गोळा होतो. भूसंपादनासाठी स्वतंत्र हेड नाही. त्यात काही निधी ऑनलाईन येतो, तो खात्यावर दिसत नाही. त्यावेळी संबंधित कर्मचार्याला बोलावून घेण्यात आले. त्याने ऑनलाईनला 9 कोटींचा निधी असल्याचे सांगितले. पण, तो खात्यावर दिसत नाही.
त्यावर आम्ही काम करीत आहोत, असे सांगितले. या निधीचे ऑडिट नसल्याने दीड वर्षापासून हा प्रकार सुरू आहे, असे निरीक्षण मुख्या लेखा अधिकारी मोरे यांनी नोंदविले. 9 कोटींचा सविस्तर तपशील द्यावा, असे सभापती कवडे म्हणाले. चर्चेत अनेक विभागाच्या निधीत वाढ सुचविण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बारस्कर, पाऊलबुधे, नगरसेविका जाधव सहभागी झाले.
सामाजिक संस्थांचे अनुदान वाढविले
शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गतवर्षी त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 7 लाखांची तरतूद होती. यावर्षी दहा लाख करण्यात आली. त्यातील सात लाख रसिक ग्रुपच्या पाडवा महोत्सवासाठी तर, दीड लाख नगर जल्लोष व दीड लाख पटर्वधन प्रतिष्ठानसाठी सूचविण्यात आले.
46 कोटींची थकबाकी
दुष्काळामध्ये नगर तालुका व पाथर्डी तालुक्याला महापालिकेच्या वसंत टेकडी येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्याचे नगर तालुका व पाथर्डी पंचायत समितीकडे 46 कोटींची थकबाकी आहे. तर, ग्रामपंचातींकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
भूसंपादन निधीसाठी स्वतंत्र खात्याचा प्रस्ताव द्या
विकासभारमध्ये भूसंपादन, अंतर्गत विकासकामे निधीसह अन्य निधी जमा होतो. त्यामुळे 75 टक्के निधी भूसंपादनसाठी राखीव असताना तो दिसत नाही. त्यामुळे विकासभारच्या निधीसाठी दोन स्वतंत्र बँक खाते करावे. भूसंपादनच्या निधीसाठी स्वतंत्र खाते करावे. तसा प्रस्ताव नगररचना विभागाने द्यावा, असे मुख्य लेखा अधिकार्यांनी सुचविले.
ओढा नव्हे लवण; नगररचनाचा जावईशोध!
सावेडी उपनगरातील पाईपलाईनलगत मनमाड रस्त्याशेजारी ओढ्यावर शॉपिंग कॉम्पलेक्स उभारणीसाठी लेआउट मंजूर करण्यात आला आहे. गावडे मळ्यातही ओढ्यावर इमारत उभी करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केला. तो लेआउट जुना आहे. तसेच तिथे लवण असल्याने पाणी साचते, असे सांगून चारठाणकर यांनी विषयांतर केले.
मुख्यलेखा अधिकारी मोरे यांनी सोप्या भाषेत अर्थसंकल्प मांडला. अनेक अधिकार्यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले. त्यामुळे पैसे नेमका येतो कसा आणि जातो, कसा याचा ताळमेळ लागण्यास मदत झाली. अशा अधिकार्यांची महापालिकेला नितांत गरज आहे.
– गणेश कवडे, सभापती, स्थायी समिती