अपघातात शिरसगावचा तरुण जागीच ठार | पुढारी

अपघातात शिरसगावचा तरुण जागीच ठार

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नेवासारोड वरील वडाळा महादेव परिसरात झालेल्या अपघातात शिरसगाव येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विकी दौंड (शिरसगाव ता. श्रीरामपूर) असे अपघात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना बोलेरो गाडी ट्रॉलीच्या हुकात अडकली. या गाडीच्या मागे विकी दौंड येत होता. या गाडीवर तो आदळला. त्याच्या पाठीमागे असणारी दुसरी दुचाकी त्याच्या गाडीवर आदळली. अचानक झालेल्या अपघातात विकी हा गंभीर जखमी झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरून आणखी दोघे गंभीर जखमी झाले.

या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दौंड यांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दुसर्‍या दुचाकीवर जखमी झालेले तरुण हे नेवरगाव येथील असल्याचे कळते. घटनास्थळी पोलिस हवालदार संतोष परदेशी, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे, गृहरक्षक दलाचे चंद्रकांत मोरकर, राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.

वाहतूक सुरळीत करत शिरसगाव येथील जखमी विकी दौंड यांना व इतर दोघे यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहे. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत.

Back to top button