नगर : कॅन्टोन्मेंट : शिवसेना-भाजपची युती; पदाधिकार्‍यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | पुढारी

नगर : कॅन्टोन्मेंट : शिवसेना-भाजपची युती; पदाधिकार्‍यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नगर; पुढारी वृत्तसेवा : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे लढणार आहे. तसा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. शहरातील विविध विषयांवर चर्चा करून हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी नगर शहर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार राम शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, वैभव लांडगे आदींसह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामांवरील स्थगिती उठविली
भूषणनगर लिंक रोड ते कल्याण रोड या 12 कोटी रूपयांच्या कामावरील, मनपा हद्दवाढीतील 15 कोटी रूपयांच्या, भूषणनगर येथील 5 कोटी, इंडस्ट्रियल इस्टेट येथील 5 कोटी व सिव्हिल हडको येथील 5 कोटी रूपयांच्या कामांवरील स्थगिती उठविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नगरविकास खात्याच्या सचिवांना दिले. नगरमध्ये होणार्‍या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेत उपस्थित राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पदाधिकार्‍यांना दिले.

Back to top button