राहुरीत वीज कोसळली; घरे खाक, संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळाली | पुढारी

राहुरीत वीज कोसळली; घरे खाक, संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळाली

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वावरथ येथील तळे पठार हद्दीत दोन छप्पराच्या घरावर वीज कोसळल्याने मोठी नुकसान झाले. घरातील व्यक्तींना विजेचा शॉक लागताच ते बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेमध्ये दोन्ही कुटुंबियांचे संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. दोन जणांना विजेचा शॉक लागल्याने जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वावरथ येथील लखन पवार व बाबूराव नाना पवार असे दोघे शेजारी छपरामध्ये राहतात. गुरुवारी पहाटेच्या 3.30 वाजता अचानकपणे वीजेचा कडकडाट सुरू झाला. वादळी वारा होताच वीज कोसळली. छप्परावर वीज कोसळताच लखन पवार यांसह पत्नी व मुले घराबाहेर आले. त्यानंतर बाबूराव पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी बाहेर धाव घेतली. दोन्ही कुटुंबे लहानग्या लेकरांना सोबत घेऊन बाहेर पडल्यानंतर दोन्ही छपरांनी पेट घेतला होता. आगडोंब भडकल्याने दोन्ही कुटुंबीय हतबल झाले.

संसारोपयोगी साहित्य जळून खाक होताना पाहण्याची वेळ पवार कुटुंबियांवर आली. घटनेमध्ये लखन छबू पवार (32 वर्ष) व त्यांच्या पत्नी या दोघांना वीजेमुळे शॉक बसल्याने ते जखमी झाले. या घटनेमध्ये दोन्ही कुटुंबाचे बाजरी, गहू यांच्या भरलेल्या 10 ते 12 धान्य गोण्या, पाच ते सहा हजार रुपयांची रक्कम व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले.

घटनेची माहिती समजताच सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, माजी सभापती आण्णासाहेब सोडनर, अविनाश बाचकर, माजी सरपंच रामू जाधव, धोंडीभाऊ बाचकर, रेवन्नाथ सोडनर, विठ्ठल बाचकर, तुकाराम बाचकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. संबंधित कुटुंबियांना ग्रामस्थांनी धान्य, साहित्य व रोख रक्कमेची मदत केली.

तसेच, जखमींना तातडीने रुग्णालयात नेत उपचार करण्यात आले. याप्रसंगी सरपंच बाचकर यांनी आमदार प्राजक्त तनपुरे व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राहुरी तालुका हद्दीमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना दिवसभर ढगाळ वातावरण निर्मित झाले. रात्रीच्या वेळी वीजेचा कडकडाट सुरू होता. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पवार कुटुंबियांना मदतीची गरज
लखन पवार व बाबूराव पवार या दोन्ही कुटुंबियांतील व्यक्ती ऊस तोडणी करून आपला उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीमध्ये जीवन जगत असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आले आहे. ग्रामस्थांनी छोटीशी मदत देत सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. दोघांचे छप्पर जळाल्यानंतर बेघर झालेल्या पवार कुटुंबियांना प्रशासनाची मदत मिळावी अशी मागणी सरपंच ज्ञानदेव बाचकर यांनी केली.

Back to top button