संगमनेर : वीजपुरवठा खंडित न करता पूर्ण दाबाने वीज द्या | पुढारी

संगमनेर : वीजपुरवठा खंडित न करता पूर्ण दाबाने वीज द्या

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील संपूर्ण शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अशा कठीण परिस्थितीतही तो पीक घेण्याचे धाडस करतो आहे. मात्र रात्री – अपरात्री व अपूर्ण दाबाने मिळणारी वीज, यामुळे शेतकरी मोठा संकटात आहे. सरकारने कोणत्याही शेतकर्‍याचे वीज पुरवठा खंडित न करता दिवसभर पूर्ण दाबाने वीज द्यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्षवेधी करताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपालासह कांदा पिकांचे भाव कोसळलेले आहेत. मोठ्या कष्टातून शेतकरी शेती पिकवतो आणि शेतीला भाव नसल्याने त्याची कवडीमोल किंमत होते. मागील दोन वर्षांपासून राज्यात बरा पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत असूनही मोठ्या कष्टातून पिके काढतो आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे.

अशावेळी वीज विभागाच्या वतीने देण्यात येणारी वीज ही अत्यंत कमी दाबाने कमी व रात्रीच्या वेळी दिली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठी अडचण निर्माण होते. याचबरोबर सह्याद्रीच्या पायथ्याला रात्री अपरात्री बिबट्यांचा मोठा संचार असून शेतीला पाणी द्यायचे असेल तर मोठी भीती असते. त्यामुळे सरकारने दिवसभर वीज पूर्ण दाबाने शेतकर्‍यांना दिली पाहिजे. याचबरोबर अशा कठीण काळात शेतकर्‍यांना दिलासा देताना कोणत्याही शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे. थोरात यांच्या मागणीमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

थोरात यांनी विधिमंडळात सरकारला घेरले
शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव, कांदा पिकाला पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान, आदिवासी शाळांना शंभर टक्के अनुदान यांसह विविध प्रश्नांवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाला घेरले आहे.

Back to top button