नाऊर : आ. कानडेंमुळे रस्त्यांची कामे मार्गी; खैरी-नाऊर रस्त्याचे काम सुरू | पुढारी

नाऊर : आ. कानडेंमुळे रस्त्यांची कामे मार्गी; खैरी-नाऊर रस्त्याचे काम सुरू

नाऊर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यासह वैजापूर तालुक्याला जवळून जोडणारा नाऊर ते वैजापूर या रस्त्याच्या उर्वरीत 4 कि. मी. रस्त्याच्या कामास सुरूवात झाली आहे. या 10 कि. मी. रस्त्यापैकी 6 कि.मी. रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वीच माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आ. लहू कानडे यांच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी राहिलेले 4 कि. मी. कामाचे नुकतेच रस्त्याच्या कामांस सुरवात झाली आहेे. तसेच नाऊर ते निमगांव – खैरी या खड्डेमय 1 ते दीड कि.मी. रस्त्याच्या कामास देखील सुरुवात झाल्याने आ. कानडे यांच्या विषयी ग्रामस्थांसह प्रवाशाकडून देखील धन्यवाद व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला श्रीरामपूर – वैजापूर या दोन तालुक्यांना जवळून जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा श्रीरामपूर- वैजापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. या प्रश्नी आमदार कानडे यांनी पाठपुरावा करत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मागील सरकारच्या काळात या रस्त्यास मंजुरी मिळवत हरेगाव फाटा ते नाऊर या रस्त्याचे 10 कि. मी. चे काम मागील काही महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. त्यापुढील 4. कि. मी. रस्त्याची दुरावस्था झाली होती. मात्र आमदार कानडे यांनी पुन्हा पाठपुरावा करत या 4 किलोमीटर रस्त्यासाठी शासनाच्या निधीतून साडेपाच कोटी निधीची तरतूद करून हा रस्ता केला आहे.

वैजापूरच्या आमदारांनीही लक्ष घालावे
दरम्यान वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे कायमच पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. वैजापूर भागातून शेतकरी श्रीरामपूर तसेच राहाताच्या बाजारपेठेमध्ये येत असतो. परंतु या स्त्याचे कायमच तीन तेरा वाजलेले असतात. यासाठी वैजापूरचे आमदार प्रा.रमेश बोरणारे यांनी देखील वैजापूर भागातून लक्ष घालण्याची मागणी सावखेडगंगा, लाडगाव बाभुळगाव, ढोकनांदूर आदी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Back to top button