गाळे लिलाव अनामत रकमेत मिळेल सूट; श्रीरामपूर बाजार समितीचा निर्णय | पुढारी

गाळे लिलाव अनामत रकमेत मिळेल सूट; श्रीरामपूर बाजार समितीचा निर्णय

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार आवारातील दुकान गाळे लिलाव कराराने वापरण्यास देण्याच्या प्रक्रियेतील अनामत रकमेत शेतकर्‍यांकडून आलेल्या लेखी मागणीनुसार शेतकर्‍यांसाठी सवलत देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांच्यासाठी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर येथील उपबाजार आवारातील सुमारे 32 गाळ्यांचा उद्या (दि. 17) रोजी दुपारी 2 वाजता जाहीर लिलावाद्वारे करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बाजार समितीने एक लाख रुपयांची अनामत रक्कम म्हणून पूर्वी जाहीर केली होती. मात्र सदरची एक लाख रुपयांची अनामत रक्कम ही शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांच्यासाठी अपेक्षापेक्षा जास्त होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ती कमी करण्यात यावी, अशी मागणी या सर्वांनी लेखी अर्जाद्वारे केली होती.

सदरची एक लाख रुपयाची अनामत रक्कम न घेता बाजार समितीने ती 50 हजार रुपये इतकीच घ्यावी, अशी मागणी शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारकांनी बाजार समितीकडे केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे यांनी शेतकरी, व्यापारी तसेच परवानाधारक यांच्या कडून आलेली लेखी सूचना मागणी मान्य केली असून उद्या लिलावात शेतकरी, व्यापारी तसेच परवानाधारक यांना 50 हजार रुपये भरून गाळ्यांच्या लिलावात सहभाग घेता येईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

32 गाळ्यांचा होणार लिलाव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार आवारातील सुमारे 32 गाळ्यांचा लिलाव उद्या होत आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी तसेच परवानाधारकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही प्रशासक नागरगोजे व प्रभारी सचिव वाबळे यांनी केले आहे.

Back to top button