नेवासे तालुक्यात गांजा-अफूचा ‘अंमल’; 15 लाखांची 624 झाडे जप्त | पुढारी

नेवासे तालुक्यात गांजा-अफूचा ‘अंमल’; 15 लाखांची 624 झाडे जप्त

नेवासा/कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकून 14 लाख 95 हजार 420 रुपये किमतीची गांजा व अफूची लहान-मोठी 624 झाडे जप्त केली. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत दोघांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तालुक्यातील शहापूर शिवारात बाबूराव लक्ष्मण साळवे व देवगाव शिवारात रावसाहेब गिलबिले यांनी शेतात गांजा व अफूची लागवड केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने 14 मार्च रोजी सायंकाळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले.

त्यात शहापूर शिवारातील साळवेच्या गव्हाच्या शेतातून एक लाख 11 हजार 420 रुपये किमतीची गांजाची तीन लहान-मोठी झाडे जप्त केली. देवगाव येथून गिलगिले याच्या शेतातून 13 लाख 84 हजार रुपये किमतीची 69.5 किलो वजनाची लहान-मोठी 621 अफूची झाडे जप्त केली. गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संदीप दरदंले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे करीत आहेत.

Back to top button