शेवगाव : शहरटाकळी पाणीपुरवठा पुनर्जोडणीसाठी 40 कोटी | पुढारी

शेवगाव : शहरटाकळी पाणीपुरवठा पुनर्जोडणीसाठी 40 कोटी

रमेश चौधरी

शेवगाव : जलजीवन मिशनअंतर्गत 40 कोटी 47 लाख रुपये खर्चाच्या शहरटाकळी व इतर 24 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा पुनर्जोडणी योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आमदार मोनिका राजळे याच्या प्रयत्नातून होणार्‍या या योजनेचे काम गुजरातमधील जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ही कंपनी करणार आहे. वीज बिल थकल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरटाकळी योजना बंद होती. पुनर्जोडणीमुळे या योजनेस आता पुन्हा जलसंजीवनी मिळणार आहे.

या योजनेची सतत फूटतूट होत असल्याने 1 कोटी 30 लाख 58 हजार 951 रुपये वीज बिल थकल्यामुळे 31 ऑगस्ट 2021 पासून बंद असलेली शहरटाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस आमदार राजळे यांनी जलसंजीवनी दिली आहे. 18 महिन्यांत पूर्ण होणार्‍या या योजनेचे काम जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. गुजरात, कंपनी लवकरच सुरू करणार आहे.

लाभार्थी गावात दरदिवशी दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा प्रमाणानुसार सन 2024 मध्ये 63 हजार 504 लोकसंख्येस 4 हजार 659 दशलक्ष लिटर, सन 2039 मध्ये 79 हजार 553 लोकसंख्येस 5 हजार 744 दशलक्ष लिटर, सन 2054 मध्ये 98 हजार 806 लाकसंख्येस 7 हजार 51 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा गृहित आहे.

या योजनेसाठी अस्तित्वात असलेले जलशुद्धीकरण केंद्र वापरण्यात येणार आहे. धरण जॅकवेल ते शुद्धीकरण केंद्र असे 12 हजार मीटर 350 मि.मी. व्यासाचे पाईप टाकण्यात येऊन 9 लाख 50 हजार लिटर क्षमता व 17 लाख 50 हजार लिटर क्षमतेच्या अस्तित्वातील मुख्य संतुलन टाक्यांचा वापर केला जाणार आहे.

मुख्य संतुलन टाकीपासून 90 मि.मी.ते 400 मि.मी. व्यासाचे 90 हजार 922 मीटर पाईप, तर प्रस्तावित उंच टाकी पाणी पुरवठ्यासाठी 75 मि.मी. ते 200 मि.मी. व्यासाचे 1 लाख 60 हजार 604 मीटर पाईप वापरण्यात येणार आहेत. आखतवाडे, भावीनिमगाव, देवटाकळी, गरडवाडी, मलकापूर, एरडंगाव, हिंगणगाव, शहरटाकळी, सुलतानपूर बुद्रुक येथे उंच पाण्याच्या टाक्या प्रस्तावित असून, तीन महिने पाणी चाचणीचा कालावधी आहे.

या गावांचा योजनेत समावेश

आखतवाडे, मक्तापूर, भातकुडगाव, भावीनिमगाव, बोडखे, दादेगाव, दहिफळ, देवटाकळी, आपेगाव, ढोरजळगाव शे, गरडवाडी, मलकापूर, ढोरजळगाव-ने, अंत्रे, ढोरसडे, एरंडगाव, लाखेफळ, आंतरवाली खुर्द, हिंगणगाव-ने, खामगाव, मजले शहर, शहरटाकळी, सुलतानपुर बुद्रुक, ताजनापूर, मुर्शतपूर, बेलगाव, लखमापुरी, सोनेसांगवी, वरखेड, आंतरवाली बुद्रुक या 30 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.

30 गावांचा पाणीप्रश्न मिटणार
दरम्यान, जुनी योजना बंद पडल्याने आमदार राजळे यांनी वाड्या-वस्त्या गृहित धरून या योजनेचे पुनर्जोडणी योजनेत रूपांतर केल्याने 24 ऐवजी 30 गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

Back to top button