नगर : ‘एन्फ्लुएंझा’ची लक्षणे; घाबरू नका औषधोपचार घ्या | पुढारी

नगर : ‘एन्फ्लुएंझा’ची लक्षणे; घाबरू नका औषधोपचार घ्या

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहरात एका युवकाचा एन्फ्लुएंझा आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोविड व एन्फ्लुएंझा आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सोमवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एन्फ्लुएंझामुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोवीड व एन्फ्लुएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात नियमित धुवावेत. मास्कचा वापर करावा. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमालचा वापर करावा. पौष्टिक आहार घ्यावा. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. फळे व हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

गर्भवती महिला, वृद्ध व्यक्तींना अधिक धोका

एन्फ्लुएंझा आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती तसेच 5 वषार्ंखालील बालके यांना आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे या बाबी कटाक्षाने टाळाव्यात. ज्या व्यक्तींचे कोविड लसीकरण झालेले नाही, त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button