दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू, श्रीगोंदे तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील थरारक घटना | पुढारी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू, श्रीगोंदे तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील थरारक घटना

श्रीगोंदा (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे दरोडेखोरांनी केेलेल्या हल्ल्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला. मध्यरात्री एकच्या सुमारास ही थरारक घटना घडली. कल्याण गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव असून, दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह पंधरा हजारांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरणगाव दुमाला शिवारात राहणारे कल्याण व शर्मिला गायकवाड हे शेतमजूरदाम्पत्य सोमवारी (दि. 13) रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास तीन ते चार दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी दरवाजाचा आवाज झाल्याने दोघेही जागे झाले. दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून शर्मिला यांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचा ऐवज काढून घेतला. नंतर कपाटातील सामानाची उचकापाचक करत त्यातील पाच हजार रुपये घेऊन निघून जाऊ लागले.

त्याच दरम्यान सधी साधून मदत मिळविण्याच्या उद्देशाने कल्याण गायकवाड घरातून बाहेर पळू लागले. ते दरोडेखोरांनी पाहिले आणि त्यातील एकाने दगडसदृश टणक हत्यार त्यांना फेकून मारले. ते कल्याण यांच्या डोक्याला लागल्याने ते खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, कल्याण यांच्यावर हा हल्ला केल्यानंतर दरोडेखोर पळून गेले. जाताना त्यांनी गायकवाड यांच्या घराला बाहेरून कडी लावली. त्यामुळे गायकवाड यांच्या पत्नी शर्मिला यांनी मोबाईलवरून फोन करून आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत बेलवंडी पोलिसाना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोक जमा झाले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र या वेळी कल्याण गायकवाड घरात नव्हते. त्यांचा शोध घेतला असता ते अंधारात मृतावस्थेत पडलेले आढळल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय ठेंगे यांनी पहाटेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी पोलिस पथके तयार करून त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनीही नंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वानपथक, ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते.

पोलिस पथके रवाना

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी याबाबत सांगितले, की या गुन्ह्यातील काही संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात असतील.

Back to top button