नगर: कोर्टातली केस मागे घेत नाही म्हणून जाळला शेजार्‍याचा 8 क्विंटल कापूस | पुढारी

नगर: कोर्टातली केस मागे घेत नाही म्हणून जाळला शेजार्‍याचा 8 क्विंटल कापूस

पाथर्डी तालुका (नगर), पुढारी वृत्तसेवा: कोर्टातली केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून फुंदे टाकळी येथील दोन जणांनी मंदा भागिनाथ फुंदे यांचा आठ क्विंटल कापूस जाळून टाकल्याची घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता निदर्शनास आली. याप्रकरणी मंदा फुंदे यांच्या फिर्यादीवरून लहू तुकाराम फुंदे व खंडू ज्ञानदेव फुंदे (रा. फुंदे टाकळी) यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहु फुंदे व खंडू फुंदे हे मंदा फुंदे यांच्या घराशेजारी राहत असून जमीन वाटपावरून मंदा यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयातून दावा काढून घेण्यासाठी मंदा व त्यांच्या कुटुंबीयांंना आरोपी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देतात. सोमवारी (दि. 13) त्यांच्यात वाद झाला, त्या वेळी कोर्टातील दावा काढून घे, नाही तर तुला दाखवून देऊ, असा दम दिला. मंगळवारी पहाटे मंदा फुंदे यांनी बाजूच्या खोलीत ठेवलेला आठ क्विंटल कापूस जळाल्याचे लक्षात आले. त्या वेळी आरोपी लहू व खंडू म्हणाले की, तुला सांगितले होते की, कोर्टातील केस मागे घे, आमच्या नादी लागू नको, भोग आता तुझ्या कर्माची फळे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button