नगर : कंपनीत चोरी करणारे दोघे सराईत गजाआड | पुढारी

नगर : कंपनीत चोरी करणारे दोघे सराईत गजाआड

नगर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीतील कंपनीत प्लॅस्टीक गोण्यांची चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चोवीस तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सचिन ठकाराम भगत (रा.सुपा, ता.पारनेर), पवन शंकर जगताप (रा.शेंडी बायपास रोड, नवनागापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू लक्ष्मण (रा.सावेडी) यांच्या एमआयडीसीतील स्पेशालिटी एंटरप्रायजेस कंपनीतून चोरट्यांनी 13 मार्च रोजी 30 प्लॅस्टिक दाणा गोण्यांची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती.

दरम्यान, ही चोरी सचिन ठकाराम भगत व पवन शंकर जगताप या आरोपींनी केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना खबर्‍याकडून मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली. सहा लाख 57 हजार 225 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात 57 हजार 225 किमतीच्या 21 गोण्या प्लॅस्टिक दाणा व सहा लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला.

आरोपींना दोन दिवस कोठडी
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 15 मार्चपर्यंत आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Back to top button