कर्जत : ‘त्याची’ मृत्यूशी झुंज नऊ तासांनंतर थांबली! | पुढारी

कर्जत : ‘त्याची’ मृत्यूशी झुंज नऊ तासांनंतर थांबली!

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : नऊ तास अथक परिश्रम करूनही कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या सागर उर्फ दादा बुधा बरेला (वय 5) या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला वाचविण्यासाठी प्रशासनाने सर्व प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोपर्डीतील शेतकरी काकासाहेब सुद्रिक यांच्या शेतात ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडला. यानंतर बैलगाडीमधून उसाचे वहाढे आणण्यासाठी गेले होते. बैलगाडीमधून खाली उतरताना छोट्या सागरने थेट मोकळ्या बोअरवेलवर उडी मारली. तिथेच ही दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित तातडीने पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. वाटेत त्यांनी महसूल व पंचायत समिती, नगरपंचायतच्या सर्व विभागांना माहिती देऊन त्यांना मदत करण्यासाठी बोलावून घेतले. नगरपंचायतचे अग्निशमन दल, आरोग्य विभागाची अ‍ॅम्ब्युलन्स, खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालक मेहराज पठाण, ऑक्सिजनची व्यवस्था, ‘जेसीबी’ मशिन आदी सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

नऊ तासांचे अथक परिश्रम
सर्व यंत्रणा तब्बल सलग नऊ तास छोट्या सागरला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेत होती. मध्यरात्री अडीच वाजता ‘एनडीआरएफ’च्या पथकाला सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी उपस्थित नागरिक, अधिकार्‍यांचे चेहरे आनंदीत झाले; मात्र त्यांच्या चेहर्‍यावरील हा आनंद फार काळ टिकला नाही. त्या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली असता सागरची प्राणज्योत मालवलेली होती. डॉक्टरांनी याबाबत माहिती देताच क्षणात परिसरामध्ये स्मशान शांतता पसरली.

दोराच्या साह्याने वर घेण्याचा प्रयत्न
सागर बोअरवेलमध्ये पडलेला, त्याचे आई-वहिलांनी पाहिले ते स्वतः सोबत होते. आणखीन काही मुले त्या ठिकाणी होती. यानंतर त्यांनी तत्काळ दोर आणून तो बोरमध्ये सोडला व त्याच्या साह्याने सागरला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सागर दोर धरून वरती येण्याचा प्रयत्न करत होता. वरील मंडळीही त्याला खेचत होते; मात्र तो वरती येण्याच्या ऐवजी माती अंगावर पडू लागल्यामुळे खाली पडला आणि आणखीन खोल गेला. दोराच्या साह्याने त्याला काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर ही माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली.

दोन्ही आमदारांची मदत
या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी अधिकार्‍यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेत सागरला कोणतीही मदत लागली तरी कळवा; मात्र त्याचा जीव वाचला पाहिजे अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या.

मशिनरीचे आवाज झाले बंद
कोणीच कोणाशी काही बोलण्यास तयार नव्हते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर नाराजी, चिंता अन् दुःख होते. परिश्रम करूनही सागरला वाचवता न आल्याने सर्वांमध्ये निराशा पसरली होती. यानंतर छोट्या सागरचा मृतदेह बुरानपूर (मध्य प्रदेश) येथे अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.

‘एनडीआरएफ’ पथक दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी नगर आणि पुण्याच्या ‘एनडीआरएफ’चे पथकालाही संपर्क करून बोलावून घेतले. दरम्यान, तालुक्यातमध्ये सर्वत्र घटनेची माहिती होताच मोठ्या वेगाने मदत कार्य कोपर्डीला पोहोचले. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या घटनेमध्ये सागरला बाहेर काढण्यासाठी मदत करत होता.

खडक लागल्याने मदत कार्यात अडथळा
दोन ‘जेसीबी’ मशिन व अन्य यंत्रणेच्या माध्यमातून बोअरवेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र, दहा फुटाच्या पुढे खडक लागल्याने खोदकामाचा वेग मंदावला. या घटनेनंतर सातत्याने सागरशी ‘दादा’नावाने हाका मारून संवाद साधला जात होता. त्याला हाका मारून ‘तू व्यवस्थित आहे का?’ याची विचारणा केली जात होती. हाका मारल्यावर तो होकारही देत होता. सहा-सात तास झाले तरी सागर मृत्यूशी झुंज देत होता. वरून आवाज आल्यावर प्रतिसाद देत होता.

आमदार रोहित पवारांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून पुणे व नगर येथून ‘एनडीआरएफ’ची टीम रवाना करण्यास सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या यंत्रणेतील दिनेश कारंडे, श्याम निकाळजे, केशव शेलार यांनी तत्काळ घटनास्थळी अ‍ॅम्ब्युलन्स व एक ‘जेसीबी’ मशिन उपलब्ध करून दिले. गणेश लिहिणे व दिनेश सुद्रिक यांनी ‘जेसीबी’ तत्काळ उपलब्ध करून दिला. नांदगाव येथील नितीन विटकर यांनी ब्लास्टिंग ट्रॅक्टर दिला. प्रांताधिकारी गटविकास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक, आरोग्य विभागाची अधिकारी आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मदत केली.

                                                        – प्रा. तात्यासाहेब सुद्रिक, ग्रामस्थ

Back to top button