नगर : हमालाने आडत दुकानदाराला लुटले; तिघांना अटक

नगर; पुढारी वृत्तसेवा : आडत दुकानदाराला मित्रांच्या मदतीने लुटणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आडत दुकानदार व हमाल दुचाकीवरून जात असताना तीन जणांनी खर्डा (ता.जामखेड) येथे दहा लाखांनी लुटले होते. आडत दुकानदाराकडे काम करणारा हमाल हाच या गुन्ह्यात मास्टर माईंड निघाला असून, आरोपींकडून सात लाख 10 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तुषार ऊर्फ सोन्या दीपक आल्हाट (रा. सोनेगाव ता. जामखेड), पृथ्वीराज ऊर्फ बबलू बाळासाहेब चव्हाण (रा. सदर), गणेश सुभाष कांबळे (रा. सदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दत्तात्रय कुंडलीक बिरंगळ (रा. सोनेगाव, ता. जामखेड) यांचा शेतकर्यांकडून भुसार मालाची खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी बिरंगळ व दुकानाचा हमाल गणेश कांबळे हे दोघे बार्शी (जि.सोलापूर) येथून भुसार मालाची विक्री करुन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यांच्याकडे 10 लाखाची रोकड होती. धनेगाव शिवारातील लोहकरे वस्ती येथे दोघे आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन बुरखाधारी इसमांनी दत्तात्रय बिरंगळ यांना दांडक्याने मारहाण केली व हमाल गणेश कांबळे याला रस्त्याच्या बाजूला ढकलून देत दहा लाखांची रोकड लुटून नेली होती.
याबाबत खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दत्तात्रय बिरंगळ यांच्याकडे काम करणारा हमाल गणेश कांबळे हा या गुन्ह्यात सामिल असून त्यानेच दोन साथीदारांच्या मदतीने रोकड लुटल्याची माहिती एलसीबीला खबर्याकडून मिळाली होती. आरोपींना अटक केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व सात लाख रुपयांची 10 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाईसाठी आरोपींना खर्डा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.