नगर : झेडपी ठप्प; 15 हजार कर्मचारी संपावर! 100 टक्के बंद | पुढारी

नगर : झेडपी ठप्प; 15 हजार कर्मचारी संपावर! 100 टक्के बंद

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन काल कर्मचार्‍यांनी 100 टक्के यशस्वी करून दाखविले. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. तर शाळा, महाविद्यालयेही ओस पडल्याचे दिसून आले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी संपात सहभागी तब्बल 15 हजार कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्याचे समजले.
संपूर्ण राज्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप सुरू झाला आहे. या संपात जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी झाले होते. संपात सहभागी कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत.

मुख्यालयातील 297 कर्मचारी संपात
जि. प. मुख्यालयात 378 कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे. यापैकी 49 कर्मचारी रजेवर गेलेले आहेत. तर 297 कर्मचार्‍यांनी संताप सहभाग घेतल्याचे पुढे आले. तर नवीनच नियुक्त्या मिळालेले 31 कर्मचारी कार्यालयात उपस्थित दिसले.

संपूर्ण बांधकाम विभाग रजेवर!
प्राप्त आकडेवारीनुसार, बांधकाम उत्तर विभागात 35 कर्मचार्‍यांची नेमणूक आहे. तर पूर्वपरवानगीने रजेवर गेलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ही 34 दिसून आली. त्यामुळे या रजा कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी कशा मंजूर केल्या, याविषयीही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीईओही नव्या पेन्शनमध्येच!
जि.प. कर्मचार्‍यांनी सीईओ आशिष येरेकर यांची भेट घेवून, जुनी पेन्शन हा तुमचाही प्रश्न आहे, तुम्हीही आंदोलनात सहभागी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, सीईओंनी शासनाच्या सूचनांचा आदर करा, कामकाज सुरू ठेवा, अन्यथा कारवाईचा इशारा दिल्याचे समजते.

जिल्ह्यातून 14 हजार कर्मचारी सहभागी
जिल्ह्यातील 14 पंचायत समिती तसेच यातील शिक्षक संवर्गासह 15 हजार 615 कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे. कालच्या संपात 14 हजार 228 कर्मचारी सहभागी असल्याचे निदर्शनास आले. तर नवीन नियुक्त्या असलेले 1118 कर्मचार्‍यांनी कार्यालये सुरू ठेवल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातून 14 हजार कर्मचारी सहभागी
जिल्ह्यातील 14 पंचायत समिती तसेच यातील शिक्षक संवर्गासह 15 हजार 615 कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे. कालच्या संपात 14 हजार 228 कर्मचारी सहभागी असल्याचे निदर्शनास आले. तर नवीन नियुक्त्या असलेले 1118 कर्मचार्‍यांनी कार्यालये सुरू ठेवल्याचे दिसून आले.

डॉक्टरांची सेवा सुरूच
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात सर्व संवर्गातील 944 कर्मचारी आहेत. त्यातील डॉक्टर संपावर गेले नव्हते. रुग्णसेवा सुरूच होती. मात्र वर्ग क,ड मधील तब्बल 605 कर्मचारी संपात सहभागी झाले. सिव्हीलचा एकही डॉक्टर संपावर गेलेला नसल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या अहवालातून समजले.

शाळा बंद, परीक्षा सुरळीत!
संपामुळे 90 टक्केपेक्षा अधिक शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले. काल बारावीचा पेपर होता. मात्र शिक्षकांनी संपात सहभागी न होता पर्यवेक्षकाची जबाबदारी सांभाळल्याने कोणतीही अडचण आली नाही. आजच्या पेपरला पर्यायी व्यवस्था सज्ज असल्याचेही प्रशासनाकडून समजले.

शासनाने सूचना करूनही संपात अनेक कर्मचारी सहभागी झालेले आहेत. संबंधित कर्मचार्‍यांना शासनाच्या सुचनांनुसार रितसर नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. दहावी, बारावी परीक्षेला अडचण आलीच तर पर्यायी व्यवस्था केली आहे.

                           – आशिष येरेकर, सीईओ जि.प.

Back to top button