नगर : शासकीय कर्मचारी रस्त्यावर; कार्यालये ओस

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनसाठी एकीची वज्रमूठ दाखवित सरकारी कर्मचारी व शिक्षक संपात सहभागी झाले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, या संपात जिल्हाभरातील 18 हजार 840 कर्मचारी सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचार्यांची सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे भरा,चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक शिक्षकेतर कमर्र्चार्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा या विविध मांगण्यांसाठी समन्वय समितीने 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली.
या हाकेला ओ देत जिल्हाभरातील सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारी संपात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांच्या नेतृृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत कर्मचार्यांनी निदर्शने केली. यावेळी ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘कर्मचारी एकजुटीचा विजय ’या घोषणाबाजीने परिसर दणाणला.
कर्मचारी व शिक्षकांच्या आंदोलनाने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जुनी पेन्शन मागणीचा मजकूर असलेल्या गांधी टोप्या घालून कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलकांच्या गांधी टोप्या लक्ष वेधून घेत होत्या. सरकारने कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मांगण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्या मनातील धगधगता असंतोष संपाच्या रुपाने बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा नियंत्रक रावसाहेब निमसे यांनी दिला आहे.
यावेळी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, सर्वच कार्यालयातील क व ड वर्गातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले. याचा फटका नागरिकांना बसला आहे. शासकीय कार्यालयांत दिवसभर शुकशुकाट होता. अधिकारी मात्र कार्यालयांत उपस्थित होते. मात्र, कर्मचारीच नसल्यामुळे त्यांनी जुन्या फायली मार्गी लावल्या आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षेला सहकार्यचा निर्णय
अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकेतर जिल्हा समन्वय समितीतर्फे मोर्चाच्या समारोपनंतर झालेल्या बैठकीत संपाच्या पार्श्वभूमिवर विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला संबंधित पर्यवेक्षक, केंद्रसंचालकांनी उपस्थित राहून काळ्याफिती लावून परीक्षेचे कामकाज करावे, मस्टरवर स्वाक्षरी करू नये, इतर वर्गाना सुटी द्यावी व समन्वय समितीच्या सदस्यांनी तालुकास्तरावर संघटनेच्या कार्यालयात जिल्हास्तरावर माध्यमिक सोसायटीत सकाळी 11 ते 2 वेळेत उपस्थित रहावे, मुख्याध्यापकांनी दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळास्तरावर ताब्यात घ्यावे, मात्र पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा, शिक्षकांनी बोर्डाचे पेपर तपासणीसाठी ताब्यात घेऊ नयेत, आदी निर्णय करण्यात आले. तर, शाळेने कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये, असे आवाहन समन्वय समितीने केले.
संपात सहभागी विभागनिहाय कर्मचारी
जिल्हा परिषद : 14525, महसूल : 957, जिल्हा शल्यचिकित्सक : 605, वन विभाग : 83, जिल्हा भूमी अभिलेख : 210, कृषी विभाग : 451, मुळा पाटबंधारे 137, जिल्हा कोषागार : 69, सार्वजनिक बांधकाम : 274, जिल्हा उपनिबंधक : 75, समाजकल्याण 23, सहजिल्हा निबंधक : 44, जिल्हा हिवताप : 321.
अद्याप कोणालाच नोटिसा नाही
संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक असल्याची सूचना कर्मचार्यांना देण्यात आली. सहभागी होणार्या कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. मात्र, अद्याप एकाही कर्मचार्याला नोटीस बजावली गेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.