नगर : मनपाची वीज चोरी ठेकेदार रोखणार | पुढारी

नगर : मनपाची वीज चोरी ठेकेदार रोखणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या व्यापारी संकुलमध्ये मनपाच्या वीज कनेक्शनमधून वीज चोरी होत असल्याचे अतिक्रमण विभागाच्या कारवाईत निष्पन्न झाले. मनपाच्या विद्युत विभागाने संबंधित ठेकेदाराला वीज चोरी रोखण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापि ठेकेदाराला वीज चोरी थांबविता आली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महापालिकेने पथदिव्याचे वीजबिल मोठ्या प्रमाणात येत असल्याने स्मार्ट एलईडी पथदिवे आणले. संपूर्ण शहरात एलईडी बसविण्यात आले. त्यासाठी पथदिवे बसविणे व त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचे काम एक संस्थेला (ठेकेदाराला) दिले आहे. स्मार्ट एलईडी बसविल्याने वीजबिल कमी होईल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल कमी झाले नाही. त्यात पथदिव्यांच्या वीज कनेक्शनमधून शहरात जागोजागी वीज चोरी असल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे संबंधित ठेकेदाराला वीज चोरी रोखण्याच्या सूचना विद्युत विभागाने दिल्या होत्या. परंतु, प्रात्यक्षात त्यावर कोणीही काम केले नाही. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत सराफ बाजारामध्ये अतिक्रमण हटविण्यात आले. त्यावेळी महापालिकेच्या वीज कनेक्शनमधून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले. आयुक्तांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. परंतु, अशाच प्रकारची चोरी महापालिकेच्या अन्य व्यापारी संकुलामध्ये होत असल्याचे बोलले जात आहे. त्यात अमरधाम, नालेगाव, प्रोफेसरकॉलनी चौक परिसरात महापालिकेच्या व्यापारी संकुलात वीज चोरी होत असल्याची तक्रारी आहेत. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्यापि शोध मोहीम राबविलेली नाही.

ठेकेदारांना सूचना : जोशी
मनपाच्या वीज कनेक्शनमधून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. परंतु, ती वीज चोरी थांबविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत, असे विद्युत विभागप्रमुख जोशी यांनी सांगितले.

Back to top button