नगर : प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड | पुढारी

नगर : प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

नगर; पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना रात्रीच्या वेळी टार्गेट करून लुटणारी टोळी कोतवाली पोलिसांच्या डीबीने जेरबंद केली आहे. माळीवाडा वेशीजवळून दोन सराईतांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 41 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोईन बादशहा शेख (रा.मुकुंदनगर), शाहरुख आलम शेख (रा.नागरदेवळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरातील नेवासकर पेट्रोलपंपासमोरुन घरी जात असताना सिक्युरिटी गार्डला रस्त्यात अडवून लुटल्याची घटना शुक्रवारी (दि.10) घडली होती.

याबाबत श्रीमंत कोंडीबा पवार (रा.एकनाथनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांना अडवून तीन लुटारुंनी त्यांच्या खिशातील 1820 रुपये बळजबरीने घेवून पोबारा केला होता. दरम्यान, मोईन बादशहा शेख याने त्याच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हे मोटारसायकलवरून माळीवाडा वेशीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथक सापळा लावून थांबले होते.

निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. एक हजार 820 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 41 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार शरद गायकवाड करीत आहेत. कोतवालीचे ठाणेदार चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार शरद गायकवाड, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी
आरोपींनी याआधी बसस्थानक परिसरात लुटमार केली असून, मोईन बादशाह शेख याच्यावर कोतवाली, नगर तालुका व शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button