नगर : बजेट @ 1240 कोटी; मनपाचे 2023-24 चे अंदाजपत्रक स्थायीसमोर सादर | पुढारी

नगर : बजेट @ 1240 कोटी; मनपाचे 2023-24 चे अंदाजपत्रक स्थायीसमोर सादर

नगर; पुढारी वृत्तेसवा : महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून घरपट्टी आकारणी करणार असून, त्यातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. स्व-मालकीच्या जागांचा विकास करून महसुली उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे सांगत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सोमवारी (दि. 13) सन 2023-24 चे 1 हजार 240 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले.

स्थायी समितीचे सभापतीगणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी समिती सदस्य संपत बारस्कर, विनीत पाऊलबुधे, मुद्दसर शेख, नजीर शेख, प्रदीप परदेशी, सुनील त्रिंबके, नगरसेविका रूपाली वारे, सुनीता कोतकर, ज्योती गाडे, सुवर्णा गेणप्पा, कमल सप्रे, पल्लवी जाधव यांच्यासह आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्यलेखा अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते. आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, शहरातील विविध विकास योजना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केला आहे. महसुली 432 कोटी 21 लाख, भांडवली 740 कोटी 05 लाख दुबेरीज 42 कोटी 39 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 80 कोटी 80 लाख, संकलित करावर अधिारित करापोटी 79 कोटी 70 लाख, जीएसटी अनुदान 120 कोटी 60 लाख व इतर महसुली अनुदान 17 कोटी 85 लाख, गाळा भाडे 3 कोटी 60 लाख, पाणीपट्टी 42 कोटी 61 लाख, मीटरद्वारे पाणीपुरवठापोटी 20 कोटी, संकीर्ण 42 कोटी 39 लाख. तर भांडवली कामांवर अनुदान कर्ज व मनपा हिस्सा धरून 818 कोटी 37 लाख अंदाजित जमा होणार आहेत. त्यानुसार बारशे कोटी 40 लाखांचा अर्थसंकल्प सादर करीत रुपया येणार कसा आणि खर्च होणार कसा याचा तपशील समजावून सांगितला.

ते म्हणाले, शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी नवीन रस्ते, दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, मूलभूत आरोग्य वीज, पाणी या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. शासनाकडून प्राप्त होणार्‍या विविध कामांसाठीच्या निधीतील मुलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक विकास निधी, 15 वा वित्त आयोग सर्वांसाठी घरे निधी, पाणीपुरवठा निधी, आमदार निधी, खासदार निधी अशा सर्व निधीतील कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामांसाठी शासनस्तरावर प्रयत्न करून जास्तीजास्त निधी मिळवून शहराचा चांगल्या प्रकार विकास करणे असा संकल्प केला आहे. अंदाजपत्रकावर बुधवारी (दि. 13) रोजी सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे.

असा जाणार रुपया…
वेतन, भत्ते व मानधनावर 138 कोटी 95 लाख, पेन्शन 47 कोटी 44 लाख, पाणीपुरवठा वीजबिल 35 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिल 5 कोटी 50 लाख, शिक्षण विभाग 5 कोटी 72 लाख, महिला व बाल कल्याण 3 कोटी 34 लाख, अपंग पुनर्वसन 3 कोटी 34 लाख, मागासवर्गीय ः कल्याणकारी योजना 10 कोटी 04 लाख, माजी सदस्य मानधन 1 कोटी 50 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी, माजी सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 8 कोटी 64 लाख, कचरा संकलन व वाहतूक 1 कोटी 50 लाख, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 2 कोटी 20 लाख, अशुद्ध पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेदी 1 कोटी 50, नवीन रस्ते 13 कोटी, रस्ते दुरुस्ती 4 कोटी 25 लाख, इमारत दुरुस्ती 1 कोटी 25 लाख, ओढ नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख, कोडवाड्यावरील खर्च 26 लाख, वृक्षारोपण 1 कोटी 25 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 40 लाख, कचरा डेपो प्रकल्प 21 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 55 लाख, मालमत्ता सर्वेक्षण 20 कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 20 लाख, पुतळे बसविणे 2 कोटी 10 लाख, भविष्य निर्वाह निधी तूट 5 कोटी, बेवारस प्रेत विल्हेवाट 75 लाख, उद्यान दुरुस्ती 75 लाख.

असा येणार रुपया..
महसूल 432 कोटी 21 लाख उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यात कर, अग्निशमन कर, कोंढवाडा, नसिर्ंग सेवा, लायसन्सस, मुद्रांक शुल्क, जीएसटी, रस्ते खोदाई शुल्क यासह अन्य मार्गाने मिळणारा निधी. भांडवली उत्पन्न 740 कोटी 5 लाख असून, त्यात विकास भार, अमृत पाणी, भुयारी गटार, नगरोत्थान योजना, आमदार निधी, खासदार निधी, मनपाचे स्वत उत्पन्न वगळून इतर मार्गाने मिळणारा निधी. दुबेरीज(संकीर्ण) 63 कोटी उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यात नळकनेक्शन, डिपॉझिट, शिक्षण कर, अ‍ॅडव्हॉन्स आदी मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नाचा समावेश आहे.

पहिल्यांदा मनपा घेणार कर्ज
पाणीपुरवठ्यासाठी 850 कोटी, भुयारी गटारसाठी 650 कोटी, रस्त्यांसाठी 300 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी सुरुवातीला 100 कोटींचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. शासन अथवा राष्ट्रीयिकृत बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे.

Back to top button