सिद्धटेक : शेतीला आठवड्यातून 4 दिवस वीज; दोन्ही आमदारांना लक्ष देण्याची हाक | पुढारी

सिद्धटेक : शेतीला आठवड्यातून 4 दिवस वीज; दोन्ही आमदारांना लक्ष देण्याची हाक

सिद्धटेक(ता. कर्जत); पुढारी वृत्तसेवा : दुधोडी  गावातील सर्व शेतकर्‍यांना शेतीसाठी वीज पुरवठा आठवड्यातून फक्त चार दिवस होत आहे. यामध्ये भांबोरा गावातील काही परिसराचा समावेश आहे. यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा पिके धोक्यात आली असून, ऊस पिकेही जळू लागली आहेत. यंदा पाऊस चांगला झाला असून, परिसरातील हिरींना पाणी चांगले आहे. परंतु, चार दिवस होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

याविषयी लाईनमन खटके यांना विचारले. तर, खटके म्हणाले, भांबोरा वीज उपकेंद्रातून दुधोडीला जाणारी एकच मुख्य वीज वाहिनी असून, तिच्यावरचा अतिरिक्त वीज भार कमी करण्यासाठी आपण सर्वे केला आहे. तो मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवला आहे. तो मंजूर होऊन काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण दाबाने परिसरातील शेतीला वीज पुरवठा केला जाऊ शकतो.

दुधोडीतील प्रगतशील शेतकरी संदीप परकाळे म्हणाले, अनियमित वीज पुरवठ्यामुळे पीक उत्पादनात घट होऊन मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी महावीतरणने तातडीने सर्वे केलेला प्रस्ताव मंजूर करावा.
तसेच, काम पूर्ण करावे व शेतकर्‍याला या सकंटातून मुक्त करावे.

…आधीच अतिवृष्टीचा फटका
अगोदर भीमा पटट्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्याचे पंचनामे झाले; परंतु मदत अजूनही मिळालेली नाही. त्यातच, आता अनियमित वीज पुरवठ्याच्या सकंटाने शेतकरी हतबल झाले. या प्रश्नावर आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घालून हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी दुधोडी व भांबोरा परिसरातील शेतकर्‍यांनी केली.

Back to top button