राजकीय पटावर चेकमेट कोणाला? देवेंद्र फडणवीस कर्जतला, तर नितीन गडकरी बारामतीत! | पुढारी

राजकीय पटावर चेकमेट कोणाला? देवेंद्र फडणवीस कर्जतला, तर नितीन गडकरी बारामतीत!

गणेश जेवरे

कर्जत : राम शिंदेंच्या मैत्रीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जतला आले, तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या मैत्रीसाठी व नातू आमदार रोहित पवारांसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच दिवशी, त्याच वेळी बारामतीला आले. पवार कुटुंबियांनी भाजप व उपमुख्यमंत्री फडणवीसांना वेगळ्याच पद्धतीने शह दिल्याची चर्चा कर्जत-जामखेडसह बारामती मतदारसंघात आहे. मात्र, राजकीय पटावर कोणी कोणाला चेकमेट दिला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवारांना शह देण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलावले. तर, आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व आमदार शिंदेंना एकाच वेळी शह देताना, फडणवीस कर्जतमध्ये आले, त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीमध्ये खासदार शरद पवार, विरोधी पक्ष नेेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्यासह कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही नागरिकांच्या समवेत हजर होते.

आमदार रोहित पवारांच्या या खेळीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, हा बालेकिल्ला आमदार रोहित पवारांनी काबिज केला. आता, आमदार पवारांना शह देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत पराभूत पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गजांना बाजूला ठेऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रा. राम शिंदेंना विधान परिषदेत संधी दिली अन् आमदार केले. आज मतदारसंघात रोहित पवार व प्रा. राम शिंदे असे एक राष्ट्रवादीचा तर, दुसरा भाजपचा आमदार आहे.

…अन् जोरदार शक्ती प्रदर्शन
आमदार झाल्यानंतर प्रा. राम शिंदेंनी आमदार रोहित पवारांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी मतदार संघातील मंजूर अनेक कामांना स्थगिती आणली. असा आरोप रोहित पवार करत आहेत. प्रा. राम शिंदेंना आमदार केल्याने मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. प्रा. राम शिंदेंनी शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये मेळावा घेतला अन् जोरदार शक्ती प्रदर्शन केले. महाविकास आघाडीला आणि आमदार रोहित पवारांना प्रा. राम शिंदेंनी काँग्रेसमधील एका नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देत जणू चेक मेटच दिला. आमदार रोहित पवारांनी त्याच दिवशी आणि त्याच वेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बारामती येथे निमंत्रित केले होते. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भाषणात आमदार शिंदेंच्या पाठीशी खंबीर उभा असून, त्यांना आगामी काळाही साथ देणार असल्याचे जाहीर केले.

…तर आमदार पवारांच्या खेळीची चर्चा
बारामतीमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी खासदार शरद पवार आणि कुटुंबियांचे कौतुक करताना दिसून आले. त्यांच्या शेती क्षेत्रातील संशोधनाचे व विकास कामातील योगदानाचे त्यांनी कौतुक केले. इतकेच नाही तर, कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिकांच्या हस्ते मतदारसंघासाठी 300 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार रोहित पवारांनी गडकरींचा सत्कार केला. आमदार पवारांच्या या खेळीची आता कर्जत-जामखेड व बारामतीसह राज्यात चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे भाजपबरोबरच अन्य पक्षातील अन् खास करून शरद पवारांसोबत असलेली मैत्री जगजाहीर आहे. यामुळे आता चर्चेला आणखीन उधान आले असून, रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व आमदार प्रा. राम शिंदेंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आणून शह दिल्याची चर्चा आहे.

Back to top button