शिर्डीमधून यंदा पुन्हा निवडणूक लढविणार : खासदार रामदास आठवले | पुढारी

शिर्डीमधून यंदा पुन्हा निवडणूक लढविणार : खासदार रामदास आठवले

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी लोकसभेत माझा अपप्रचार करून 2009 ला माझा पराभव केला. मात्र राजकारणात हारजीत ही चालू राहते, यातून मी काय नाराज झालो नाही. मात्र, शिर्डी व परिसरातील लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून शिर्डीच्या सर्वांगिण विकासाकरिता लोकांच्या आग्रहा खातर मी पुन्हा 2024 ला शिर्डीमधून निवडणूक लढविणार असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीप्रसंगी शिर्डी येथे आले होते. याप्रसंगी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, दिपकराव गायकवाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, पप्पू बनसोडे, रमेश मकासरे, सुनिल मोरे, चांगदेव जगताप, राजाभाऊ कापसे, आशिष शेळके, गणेश गायकवाड, राजेंद्र गवांदे, रमेश शिरकाडे, राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

मंत्री आठवले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतून काहीच साध्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दमदार नेते असून त्यांनी गोरगरीबांसाठी विविध योजना राबविल्या. त्यातून मोठे परिवर्तन होत असल्याने संपूर्ण देशात भाजपाच्या शिर्डीसह 350 ते 400 जागा निवडून येतील.

माजी खा. स्व. बाळासाहेब विखेंशी माझे चांगले संबंध असल्याने 2009 ला मी शिर्डी व त्यांनी नगरमधून निवडणूक लढविण्याचे ठरविले. मात्र राष्ट्रवादी पक्षाने जागेच्या आदला – बदलीस नकार दिल्याने त्यांची इच्छा अपुरी राहिली. मात्र ‘पवार’ हट्टामुळे त्यावेळेस दोन्ही जागा पडल्या. राजकारणात जय- पराजय चालूच राहतो. आता पुन्हा संधी मिळाल्यास शिर्डीकरांसाठी मी पुन्हा येईल, आता मात्र विजय निश्चित राहिल, या करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , जी. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखेंशी चर्चा करणार आहे.

राज्यात सत्तेचा वाटा मिळावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. किमान एक मंत्री पद, विधान परिषद, महामंडळे मिळावी, असा आग्रह आहे. सामाजिक न्याय विभागातून सर्वात जास्त निधीचा उपयोग केला आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये उद्योगाला चालना देणार असून यांचा तरुणांना फायदा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची जरी युती झाली यांचा मात्र जास्त फायदा होणार नाही. उध्दव ठाकरे यांना आपला पक्ष संभाळता आला नाही.

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी न राहील्यामुळे आमदार सुद्धा निघून गेले, हे दुदैव आहे. बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या विचारांच्या विरोधात होतेे त्यांच्याशीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मांडीला मांडी लावून बसले. त्यामुळे पक्षाला ग्रहण लागले. आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याने मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार आहे व रिपब्लिकन पक्षाला ही यांचा मोठा फायदा होणार आहे. वंचित आता ‘वंचितचं’ राहणार आहे. राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत. मात्र राष्ट्रीय राजकारणात मनसे कुठलाही फायदा होणार नाही. माजी केंद्रीय मंत्री शरदराव पवारा यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपाला साथ दिल्यास त्यांचे स्वागतचं राहिल.

पक्ष बळकट करणार ः खा. आठवले
नागालँडमध्ये आठ जागा लढविल्या होत्या. पैकी दोन आमदार निवडून आले. त्याच धर्तीवर राज्यात पक्ष बळकट करून निवडणुका लढविणार आहे. पक्षात कार्यकर्त्याचा संच मोठा आहे. मात्र केवळ फोटो काढून पक्ष मजबूत होत नाही तर गावागावात, तळागाळात संघटन महत्त्वाचे असून तरच निवडणुकांमध्ये यश मिळेल, असे रामदास आठवले यांनी आवाहन केले.

Back to top button