

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत व जामखेडमधील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या 76 नवीन निवासस्थानांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कर्जतमध्ये करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार प्रा. राम शिंदे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत येथील नवीन पोलिस निवासस्थानांची पाहणी केली. पोलिस कर्मचारी व बॅण्ड पथकातील कर्मचार्यांशी संवाद साधला. कर्जतमध्ये 3023.15 व जामखेडमध्ये 2996.31 चौरस मीटरमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसाठी 76 निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. यासाठी एकूण 15 कोटी 21 लाख खर्चून बांधण्यात आली आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस नाईक संभाजी वाबळे व पोलिस शिपाई ईश्वर माने यांना सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, उपअभियंता विजय भंगाळे, प्रकल्प अभियंता सागर सगळे, कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, जयंत कोलते, हर्षद सारडा, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.