मढीत भाविकांचा लोटला महापूर..! शंभर कोटींची उलाढाल | पुढारी

मढीत भाविकांचा लोटला महापूर..! शंभर कोटींची उलाढाल

मढी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी काल रंगपंचमीच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील लाखो भाविकांच्या गर्दीचा महापूर लोटला होता. कानिफनाथ महाराजांचा जयघोष, रेवड्यांची मुक्त उधळण, पारंपरिक ढोल, ताशा, शंख व डफाच्या तालबद्ध आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमून गेला होता.

गडाच्या पैठण दरवाजामार्गे रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुमारे पन्नास हजार काठ्या वाजत-गाजत आणून मंदिराला प्रदक्षिणा घालून कळसाला टेकविल्या गेल्या. भाविकांनी मढीबरोबरच मोहटादेवी, मायंबा, वृद्धेश्वर येथेही भेट दिल्याने संपूर्ण तालुक्याला यात्रेचे स्वरूप येऊन सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. पाथर्डी व तिसगावला वाहनांच्या संख्येने महानगरासारखे रूप आले होते. गेल्या दोन दिवसात यात्रेत सुमारे शंभर कोटी रूपयांची उलाढाल झाली.

रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन. यानिमित्त संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यासह तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यांतूनही नाथभक्त मोठ्या प्रमाणावर आले होते. यात्रेसाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने, चारशे एकर जमीनसुद्धा पार्किंग व भाविकांच्या तंबूसाठी कमी पडली. यंदा गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन देवस्थान समितीने नियोजन केले होते. दर्शनबारीत एक रांग वाढल्याने भाविकांना लवकर दर्शन मिळाले. तेथेच भाविकांना पिण्याचे पाणी देण्यात आले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, सचिव विमलताई मरकड, सहसचिव शिवजित डोके, विश्वस्त रवींद्र आरोळे, शामराव मरकड, डॉ.विलास मढीकर यांच्यासह ग्रामस्थ, कर्मचार्‍यांनी भाविकांना सेवा दिली.
ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजय मरकड, ग्रामसेवक विठ्ठल राजळे व सर्व सदस्यांनी नियोजन केले. पोलिस निरीक्षक सुरेश मुटकुळे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर यांनी व्यवस्थापन कामावर नियंत्रण ठेवले.

चारशे टन रेवडीची विक्री
मढीची रेवडी राज्यात प्रसिद्ध आहे. सुमारे चारशे टन चपटी व गोल रेवडी, सुमारे दोनशे टन गोडीशेव, सुमारे शंभर टन फरसाणची विक्री झाली. रेवडी बनविण्यासाठी यंदा प्रथमच यंत्रसामग्री वापरण्यात आली. विविध व्यवसाय मिळून एका दिवसात सुमारे पन्नास कोटी रूपयांची उलाढाल यात्रेत झाली.

चोरट्यांना पोलिसांचा दणका
यात्रेत शेकडो मोबाईल, सोनसाखळ्या, पाकिटांची चोरी झाली. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व पथकाने मंदिर परिसरातून अक्षरशः वेचून-वेचून खिसेकापू ताब्यात घेतले. खिसेकापूंनी पोलिसी दंडुक्याची एवढी दहशत घेतली की, एक जण पोलिसाच्या हाताला हिसका देत गडावरून खाली उडी मारून पळाला.

Back to top button