नगर : शिवजयंती मिरवणुकीत मारहाण; डीजे ऑपरेटरला त्रास देण्यावरून वाद

नगर; पुढारी वृत्तसेवा : शिवजयंती मिरवणुकीत डीजे ऑपरेटरला त्रास देत असल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण झाली. याबाबत शुभम मनोज कर्डिले (रा.शेरकरगल्ली, सर्जेपुरा) या युवकाने दिलेल्या जबाबावरून एका जणावर कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल किसन बत्तीन (रा.शेरकरगल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुल हा शुभम कर्डिले याचा जवळचा मित्र असून, शुक्रवारी रात्री शिवजयंती मिरवणुकीत ते सामिल झाले होते. राहुल हा मद्य पिऊन मिरवणुकीत आल्याने तो डीजे ऑपरेटरला त्रास देत होता. डीजे ऑपरेटरला त्रास देऊ नको, असे म्हटल्याचा राहुलला राग आल्याने त्याने फरशीचा तुकडा शुभमच्या डोक्यात मारला. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.