नगर : महिला वाहकाला विसरून एसटी बस निघाली सुसाट ! | पुढारी

नगर : महिला वाहकाला विसरून एसटी बस निघाली सुसाट !

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  महिला वाहकाला विसरून एसटी बस सुसाट निघण्याचा प्रकार अमरापूर बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी घडल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही अंतरावर बस थांबताच मोटारसायकलवर वाहक तेथे पोहोचल्या आणि एसटी बस मार्गस्थ झाली. शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी धावणारी पाथर्डी ते अमरापूर (एमएच 40 वाय 544) ही एसटी बस शुक्रवार (दि.10) सकाळी सात वाजता अमरापूर बसस्थानकावर आली. येथून परत पाथर्डीला जाण्यासाठी वळण घेण्याचा मार्ग दाखविण्यासाठी बसमधील महिला वाहक खाली उतरल्या. मार्ग दाखविताच ही बस पाथर्डी दिशेने फिरली.

पाहतो तर काय, वळण दाखविणार्‍या महिला वाहक खालीच असल्याचे विसरून चालक सुसाट वेगात पाथर्डीला निघाले. हा प्रकार लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला. महिला वाहकाने लगेचच एका स्थानिक दुचाकीस्वाराला थांबविले. त्यावर बसून एसटीला ओव्हरटेक करण्याची विनंती त्यांनी केली. अचानक वाहकाला विसरल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने, काही अंतरावर त्याने बस थांबविली. महिला वाहक बसमध्ये येताच एसटीचा पुढील प्रवास सुरु झाला.

Back to top button