नगर : पठारात अवकाळीने पिके आडवी | पुढारी

नगर : पठारात अवकाळीने पिके आडवी

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यात पुर्व व पठार भागात वादळ, वार्‍यासह पडलेल्या अवकाळी पावसाने शेकडो हेक्टर क्षेत्रात गव्हू, कांदा, हरभरा, मका, घास आदी पिके अक्षरशः आडवी झाली. या पिकांसह शेतकर्‍यांचे स्वप्न जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसते. यंदा रब्बीची लागवड करताना शेतकर्‍यांनी सर्वाधिक पसंती गहू पिकास दिली. हजारो हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड झाली. गव्हासह कांदा, मका, हरभरा, घास आदी पिकांचे विहिरीला पाणी असल्याने यंदा भरपूर उत्पन्न निघेल, या आशेपोटी शेतकरी होता, मात्र भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके आडवी केली.

याचा उत्पन्नात शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात पुर्व व पठार भागात सोमवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होता. रात्रभर पाऊस पडल्याने शेतकरी हालचाल करू शकले नाही. पावसाने शेकडो हेक्टर गव्हाचे पिक आडवे केले. काढणीस आलेला गहू काळा पडण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहर गळाला आहे. हरभरा, कांदा, लसून पिकांवर संक्रांत आली आहे.
नुकसानीचे पंचनामा करून भरीव मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आश्वी खुर्द येथील तात्या गायकवाड यांनी यंदा 7 एकर गहू पेरला होता. अवकाळीमुळे सर्व गहू झोपल्याने मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या चिंतातूर दिसत आहेत.

मागील अवकाळी पावसानेसुद्धा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे होवूनसुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. आता भरपाई कधी मिळणार. सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई देवून दिलासा द्यावा.
                                           – विकास गायकवाड , (शेतकरी, आश्वी खुर्द)

Back to top button