नगर : राहुरीतील गोठ्यातच दूध भेसळ..! | पुढारी

नगर : राहुरीतील गोठ्यातच दूध भेसळ..!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  गोठ्यातच दूधात व्हे पावडर, लिक्वीड पॅराफिन टाकून भेसळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने भेसळ करताना दोन शेतकर्‍यांना रंगेहाथ पकडले. राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी परिसरातील छापेमारीत 50 लिटर कृत्रिम दूध आणि 80 किलो व्ेहे पावडर जप्त करण्यात आली आहे. तांदूळवाडीत (ता.राहुरी) शेतकर्‍यांकडून दूध भेसळ केली जात असल्याची माहिती नगर येथील अन्न,औषध प्रशासन विभागाला खबर्‍याकडून मिळाली. सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदिप पवार, प्रदिप कुटे, नमूना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांचे पथक शुक्रवारी भल्या पहाटे राहुरी हद्दीत दाखल झाले. पथकाने सकाळी 6.15 वाजेच्या दरम्यान तांदूळवाडी-मांजरी रस्त्यावर रेल्वे स्टेशनलगत संदीप सूर्यभान म्हसे यांच्या गायींच्या गोठ्यावर छापा टाकला. तेथे लाईट लिक्वीड पॅराफिन 120 किलो, कृत्रीम दूध 38 लिटर, गायीचे दूध 30 लिटर व व्हे पावडर 50 किलो असे साहित्य आढळले. या ठिकाणी पथकाला दूध भेसळ सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली.

नवनाथ सबाजी खाटेकर (अष्टविनायक शाळेजवळ, तांदूळवाडी, ता. राहुरी) यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्येही पथकाने छापा टाकला. तेथेही लाईट लिक्वीड पॅराफिन 2 किलो, कृत्रीम दूध 10 लिटर, गायी दूध 40 लिटर, व्हे पावडर 30 किलो आढळली. दोन्ही गोठ्यांमधील रसायनांचे नमूने घेत तपासणीस पाठविल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिली. छापा पडल्यानंतर दोन्ही गोठ्यांचे मालक पसार झाले. सायंकाळी उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाल्याने पोलिसांवर तपास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अन्न, औषध प्रशासन पथकाने लिक्वीड पॅराफिन व व्हे पावडर नमुने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडे या तपासाची सुत्रे देण्यात आली आहेत. आरोपींचा शोध लावताना दूध भेसळीस लागणारे साहित्य कोठून उपलब्ध होत होते, याचा शोधही होणे गरजेचे आहे. दूध भेसळीची पाळेमुळे शोधण्यात पोलिस प्रशासन यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दूध पुरवठा नेमका कोणाला..?
सर्वसामान्यांसह चिमुकल्यांच्या जीवनाशी खेळणार्‍या दूध भेसळखोरांचा बुरखा फाडण्यासाठी प्रशासन नेहमी कमकुवत ठरले. आरोपी निष्पन्न होऊनही तपास पाळेमुळांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक ठिकाणी हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. भेसळीचे दूध कोणत्या संकलन केंद्राला किंवा कंपनीला पुरवठा होत होते, याचा तपास होणे गरजेचे असल्याची चर्चा होत आहे.

Back to top button