नगर : आवर्तन सुरु असताना मिरजगावात कालवा फुटला

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : सीना धरणातून शेतीसाठी सोडलेल्या आवर्तनाचे पाणी टेलपर्यंत पोहोचत असताना, मिरजगाव येथे गुरव पिंपरी रस्त्यावर खेतमाळस वस्तीजवळ कालव्याचा पूल रात्री अचानक ढासळला. मात्र, सुटलेले पाणी जवळच असलेल्या नदीतील बंधार्यात गेल्याने मोठा अनर्थ टळला. कालव्याजवळ व खाली असणार्या सर्व वस्त्या सुरक्षित राहिल्या. तसेच, कालव्याखाली असणारे शेती क्षेत्रही वाचल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील सीना धरण लाभ क्षेत्रातील मिरजगावसह अनेक गावांना संजीवनी ठरणार्या सीना धरणातून शुक्रवारी (दि.3) उजव्या कालव्याद्वारे 120 क्यूसेक्सने शेतीसाठी पाण्याची आवर्तन सोडण्यात आले होते. आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्यांना या पाण्याचा लाभ मिळणार होता.
हा कालवा पूल 1982 साली दगडामध्ये बांधलेला होता. 40 वर्षांच्या या तुटलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वीच शासनाकडून मंजुरी मिळाली होती. तसेच, गेल्या वर्षी या कामाची वर्कऑर्डर देखील निघाली होती. परंतु, संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर मिळून देखील काम न केल्यामुळे हा कॅनल फुटला, असून त्याच्या दगडी भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे पाटातून वाहणारे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये सुरू आहे. पुलाच्या कामासाठी कार्यारंभ आदेश मिळूनही ठेकेदाराने काम न केल्यामुळे ही आपत्ती आली. संबंधित ठेकेदारावर वर्षभरात कारवाई का केली नाही? याबाबत शेतकरी अंधारात आहेत.
मिरजगाव येथील मांडओहोळ कालव्याचे कार्यकारी अधिकारी यांनी या कालव्याच्या दुरुस्तीबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. हा पूल लवकरात लवकर नव्याने बनवून आवर्तन सोडण्यात यावे. अन्यथा आम्हाला उन्हाळी पिके घेता येणार नाहीत, असा सूर लाभार्थी शेतकर्यांमधून उमटत आहे. घटनेची माहिती मिळताच कुकडी कालव्याचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा उपअभियंता संदीपकुमार शेळके, शाखा अधिकारी लोखंडे व मोरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला व ताबडतोब या धरणावर सुटलेले पाणी बंद करण्याच्या सूचना केल्या.
फुटलेल्या पाटाची, कालव्याची तात्पुरती दुरूस्ती करून घेऊन सुटलेले आवर्तन प्रथम पूर्ण करू. रोटेशन संपल्यानंतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करू
– स्वप्निल काळे, कुकडी प्रकल्प अधिकारी
उपअभियंता म्हणे, अडचण नाही !
सीना धरणातून आवर्तन सुटले त्याचवेळी शाखा उपअभियंता संदीपकुमार शेळके यांच्याशी कालवा व पुलाच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली होती. यावेळी शेळके यांनी तशी काही अडचण वाटत नाही, असे दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले होते.