राहुरी : अधिकार्‍यांचे निलंबन; आ. तनपुरे आक्रमक | पुढारी

राहुरी : अधिकार्‍यांचे निलंबन; आ. तनपुरे आक्रमक

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस शासन काळात अधिकार्‍यांची मुस्कटदाबी करीत भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना कसे पाठिशी घातले जाते, याची मांडणी करीत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आ. प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाला घेरले. दरम्यान, विधीमंडळात नागरदेवळा ग्रामपंचायतीच्या विषयाला हात घालत विशेष सोयीसुविधांबाबत सूचना केल्या.

महाराष्ट्र राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजत आहे. विकासाच्या मुद्यांपेक्षा एकमेकांवर हमरी- तुमरीनेच विधीमंडळात होणारा गदारोळ पहावयास मिळत आहे. दरम्यान, अशाच गदारोळामध्ये उच्च शिक्षित आ. तनपुरे यांनी दोन मुद्यांवर मत व्यक्त करीत शिंदे-फडणवीस शासनाला घेरले. नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकार्‍यांवर दबाव निर्माण केला जात आहे.

राहुरी येथील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह श्रीरामपुरचे पोलिस निरीक्षक, कर्जतचे महसूल अधिकारी यांच्याबाबत अन्याय का केला. कोणतीही चौकशी न करता पोलिस निरीक्षक दराडे यांची बदली करण्यात आली. श्रीरामपुरचे तत्कालिन पो. नि. संजय सानप तसेच कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन करण्यात आले. या अधिकार्‍यांबाबत सत्ताधारी आमदारांनी लक्षवेधी मांडताच निलंबनासह बदलीची कारवाई करण्यात आली, परंतु शिंदे-फडणवीस शासन काळात अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई होत नसल्याने आ. तनपुरे यांनी संताप व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातील तिन्ही अधिकार्‍यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला नव्हता. तरीही सत्ताधारी आमदारांनी मागणी केली तरचं अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार का, असा आ. तनपुरे यांनी जाब विचारला. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचा शब्द दिला.

तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी आ. तनपुरे यांनी नगर तालुक्यातील नागरदेवळा नगरपरिषदेच्या मुद्यावरून शासनाला प्रश्न विचारले. अ. नगर महानगर पालिकेलगत नागरदेवळा व लगतच्या गावातील समस्या संपुष्टात येण्यासाठी नगर परिषदेची स्थापणा करण्याचा निर्णय झाला. तत्कालिन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री यांची सही देखिल झाली, परंतु सत्ता बदल होताच नगरपरिषदेचा निर्णय बदलून पुन्हा ग्रामपंचायतीत रुपांतर झाले. शासनाला शहरालगत संबंधित गावांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, कचरा समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायचा की नाही, असा सवाल आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.

गुवाहाटीस आले असते तर राज्यमंत्री असते!
आ. प्राजक्त तनपुरे यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न मांडताना मागील शासन काळात नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च तंत्रशिक्षण खाते उदय सामंत या दोघांच्या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून मी काम पाहिले. तुम्ही कॅबिनेट तर मी राज्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय कसे बदलू शकतात, असे सांगितले. यावर मंत्री सामंत यांनी तनपुरे हे आमच्यासोबत गुवाहाटीला आले असते तर त्यांना पुन्हा राज्यमंत्री केले असते, असे म्हणताच विधीमंडळात एकच हशा पिकला.

 

Back to top button