कोपरगाव : राज्याच्या प्रगतीसाठी सर्वसमावेशक अर्थसंकल्प : स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या शाश्वत, समृध्द शेती प्रगतीसाठी 6900 कोटी रूपयांच्या तरतुदीसह सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करून महिलादिनानिमित्त राज्यातील सर्व महिलांना बस प्रवासात 50 टक्के सुट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याबद्दल शिंदे- फडणवीस शासनाचे भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी अभिनंदन केले.
कोल्हे म्हणाल्या की, वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांनाच प्रगतीकडे घेवुन जाणारा आहे. संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांनाही भरीव मासिक वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे उपक्रमात 10 लाख घरे, 3 कोटी असंघटीत कामगारांना नव्याने कामगार कल्याण मंडळ, विविध समाज घटकांच्या उन्नतीसाठी नव्याने महामंडळांची निर्मिती, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचा सिंदखेडराजा- शेगावपर्यंत विस्तार करून तीर्थक्षेत्र जोड कार्यक्रम, आदिवासी पाडे, वाड्या-वस्त्या, यशवंतराव होळकर वाड्यीा- वस्त्यांसाठी 4 हजार कोटींची तरतुद, रेल्वेचे जाळे अधिकाधिक विस्तारण्यास शिंदे- फडणवीस शासनाने 50 टक्के सहभाग राज्यहिस्सा देण्याचा निर्णयातुन अ.नगर- बीड- परळी रेल्वेमार्ग, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ दर्जोन्नतीअंतर्गत नविन प्रवासी टर्मीनलसाठी 527 कोटी, राज्यातील 100 बसस्थानकांचा दर्जा सुधारणा, 8 वीपर्यंत शिक्षण घेणार्या मुला- मुलींना मोफत गणवेष, कोतवालांच्या मानधनांत वाढ, राज्यातील 75 तलावांचे सरोवर संवर्धन, वाटेगाव लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकासासाठी 25 कोटी, मराठी भाषा विद्यापीठासाठी अमरावतीतील मराठी वाड:मयाची काशी असलेल्या रिध्दपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णयासह अन्य विविध घटकांच्या विकासासाठी जाणिवपुर्वक घोषणा करून त्यानुरूप पाउल टाकले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात विशिष्ट घटकांना तरतुदी करून नव्या योजना स्वागतार्ह असल्याचे कोल्हे म्हणाल्या.