

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरुच आहे. साकुर शिवारात साकुर – संगमनेररोड लगत चिंचेवाडी हद्दीत रानवारा हॉटेलवर चार जणांनी सिने स्टाईल सशस्त्र दरोडा टाकून अमानुष मारहाण केल्याने दहशत पसरली आहे. दरम्यान, हॉटेल मालकाच्या पत्नीसह चुलत भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. 8 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून दरोडेखोर पसार झाले. हा थरार मंगळवार (दि.7 मार्च) रोजी रात्री 11ः30 वाजेच्या सुमारास घडला.
साकुर शिवारात चिंचेवाडी येथे शेती व हॉटेल व्यावसायिक भिवा राणू सोन्नर यांचे साकुर- संगमनेर रोड लगत रानवारा हॉटेल आहे. मंगळवारी रात्री 10ः30 वाजेच्या सुमारास सोन्नर हॉटेल बंद करून, 11ः30 वाजेच्या सुमारास घरी जाणार होते. त्यावेळी बाहेरून कोणीतरी हॉटेलचे दार वाजवत होते. सोन्नर यांच्या पत्नीने दार उघडले. ओळखीचा भावड्या ऊर्फ संदेश अप्पा खेमनर (रा. बोराटे वस्ती, साकुर, ता. संगमनेर) व अनोळखी तिघे अशा तोंड बांधलेल्या चौघांनी बळजबरीने हॉटेलमध्ये प्रवेश केला.
सोन्नर यांच्या पत्नीकडून काउंटरची चावी हिसकावली. काउंटर उघडून गल्ल्यातून 8 हजारांची रोकड काढून घेतली. पत्नीने आरडा- ओरडा केल्याने सोन्नर यांना जाग आली. ते झोपेतून उठून हॉटेल मध्ये आले, असता भावड्या ऊर्फ संदेश खेमनर व अनोळखी तिघांजवळ जावून, 'तू चावी का घेतली. गल्ल्यातून पैसे का काढले,' असे विचारले असता चौघांनी लाथा- बुक्क्यांनी जबर मारहाण केली. भावड्या खेमनर याने शिवीगाळ करीत चाकूने डोक्यात जोरदार प्रहार करीत प्राणघातक हल्ला केला. सोन्नर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.
त्यांच्या पत्नीने आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिकांना मदतीस आवाज दिला. सोन्नर यांचे चुलत भाऊ धोंडीभाऊ सोन्नर व संतोष सोन्नर आले. त्यांना धक्काबुक्की केली. भावड्या खेमनर याने धोंडीभाऊ सोन्नर यांच्या उजव्या हातावर चाकुचा वार करीत जखमी केले. संतोष सोन्नर यांना मारहाण केली. या सर्वांना जिवे मारण्याची धमकी देत 8 हजारांची रोकड लुटून चौघे दरोडेखोर पसार झाले.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भिवा सोन्नर व चुलत भाऊ संतोष सोन्नर जखमी झाल्याने त्यांच्यावर साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना संगमनेर येथील इथापे येथे हलविण्यात आले.
दरम्यान, डीवायएसपी संजय सातव यांंनी पो. नि संतोष खेडकर व पो. ना. एस. आर. खैरे यांनी घटनस्थळी भेट दिली.
पठार भागात गुन्हेगारीचे सत्र थांबणार केव्हा?
संगमनेरच्या पठार भागात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल पंपावर दरोडा, छोट्या-मोठ्या चोर्यांसह मारामार्या आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. पेट्रोल पंप दरोड्यातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची घटना ताजी असतांना दरोडा पडल्याने संताप व्यक्त होत आहे.
'पीडित व्यक्ती भिवा सोन्नर हे महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष असल्याने ते राजकीय क्षेत्रात काम करतात. त्यांच्यावर हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की काय, अशी चर्चा आहे. या भ्याड हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आहे.
-कोंडाजी कडनर, प्रदेशाध्यक्ष भाजप, व्हि.जी.एन.टी. सो. मीडिया)