लोणी : अर्थसंकल्पाचे‘पंचामृत’ समृद्धीचे, विकासाचे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

लोणी : अर्थसंकल्पाचे‘पंचामृत’ समृद्धीचे, विकासाचे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे व राज्याला संमृध्दीच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला. राज्यात प्रथमच गो-सेवा आयोगाची ऐतिहासिक घोषणेसह नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे म्हणाले, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात आली. रोजगार निर्मितीला प्राधान्य व पर्यावरण पुरक विकास साध्य करताना भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले गेल्याने राज्याच्या विकासाचे एक व्हिजन मांडले गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पशुसंवर्ध विभागाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी या अतिशय समाधानकारक आहेत. देशी गो-वंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षणासाठी महाराष्ट्र गो-सेवा आयोगाची स्थापना ही ऐतिहासीक बाब म्हणावी लागेल. या आयोगाच्या माध्यमातून गोवर्धन, गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मुल्यवर्धन योजना व देशी गोवंशांच्या संवर्धनासाठी भ्रृणब्राह्य फलन व प्रत्यारोपन सुरक्षेत वाढ करताना विदर्भ, मराठवाड्यातील 11 जिल्हे दूग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे यासर्व जिल्ह्यांमध्ये दूग्ध व्यवसाय विकासास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील रोजगारासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करुन, यासाठी 10हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयामुळे शेतीपुरक व्यवसायास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. या महामंडळाचे मुख्यालय अ.नगर येथे करण्याच्या घोषणेमुळे ग्रामीण विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील,असे त्यांनी सांगितले.

राज्यात शेतकर्‍यांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक आहे. शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करुन, केंद्र सरकारच्या योजनेतच 6 हजार रुपयांचे अधिक भर घालून प्रतिवर्षी 12 हजार रुपये देण्याच्या निर्णयाकडे लक्ष वेधून महाकृषी विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उत्पन्न वाढीसाठी उत्पादनापासून ते मुल्यवर्धपर्यंत सर्व बाबींसाठी मदतीची तरतुद या योजनेत करण्यात आली असे मंत्री विखे पा. म्हणाले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा अनुग्रह योजनेचा लाभही आता 2 लाखांपर्यंत वाढविला आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना अधिक व्यापक करण्याच्या निर्णयाबद्दल मंत्री विखे यांनी समाधान व्यक्त केले. मागेल त्याला शेततळे ही योजना अधिक व्यापक करण्याच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करुन, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाज घटकांचे हित जोपासत राज्याला प्रगतीसह समृध्दीच्या दिशेने टाकलेले पाऊल हे त्यांच्या निर्णय क्षमतेतून विकासाची दुरदृष्टी दाखवून देणारे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी अर्थसंकल्पानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत नमूद करून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचे स्वागत केले.

Back to top button