मढीत दहा टनांचा लाडू प्रसाद; भाविकांची वाढती गर्दी | पुढारी

मढीत दहा टनांचा लाडू प्रसाद; भाविकांची वाढती गर्दी

मढी; पुढारी वृत्तसेवा : येथे चैतन्य कानिफनाथ यात्रेचा रविवारी (दि.12) रंगपंचमी हा मुख्य दिवस असून, या दिवशी सर्वाधिक गर्दी होणार्‍याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांसाठी सुमारे दहा टनांचे लाडू तयार केले जात आहेत, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी दिली. कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यात होणार्‍या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची येथील बुंदी लाडू प्रसादाला मोठी पसंती असते. दर्शनानंतर घरी जाताना भाविक येथील लाडू प्रसाद आवर्जून खरेदी करतात. भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मढी देवस्थान समितीने तब्बल दहा टन लाडू निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून दिवसरात्र काम सुरू ठेवले आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद पडलेला लाडूचा प्रसाद यंदा मात्र भाविकांना मिळणार आहे. बुंदी गाळपापासून ते लाडू पॅकिंग करण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. भाविकांकडून हावरी, गूळ रेवडी, गुलाब रेवडी, तिळगूळ, गुळाचा मलिदा, नारळ अशा विविध प्रकारचा प्रसाद नाथांना अर्पण केला जातो.

देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांच्यासह उपाध्यक्ष सचिन गवारे, सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, डॉ. विलास मढीकर, रवींद्र आरोळे, शामराव मरकड, सहसचिव शिवजीत डोके यांच्यासह सर्वच विश्वस्त मंडळ यात्रा नियोजनासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

लाडू प्रसाद माफक दरात
अन्नछत्रालयात लाडू बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षी लाडू प्रसाद कमी पडतो. त्यामुळे यंदा संस्थानने लाडू निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. यंदा भाविकांना लाडू प्रसाद माफक दरात दिला जाईल, असे देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी सांगितले.

Back to top button